रस्ता नाही, धान रोवणी रखडली; महसूल प्रशासनाच्या दिरंगाईने शेतकरी हवालदिल
– अपंग वडिलांसह शेतकरी कुटुंबावर संकट; अंतिम निर्णयाअभावी पावसाळी हंगाम वाया जाण्याची भीती
The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि. १४ : स्वतःच्या मालकीच्या शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने कटेझरी येथील शेतकरी अविनाश बाळकृष्ण कुमरे यांची धान रोवणीची कामे रखडली आहेत. रस्त्यासाठी महसूल प्रशासनाकडे अर्ज, प्रत्यक्ष पाहणी, पंचनामा आणि सुनावणीची प्रक्रिया पूर्ण होऊनही अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याने पावसाळी हंगाम हातातून जाण्याची भीती कुमरे यांनी व्यक्त केली आहे.
कुमरे यांनी सर्वे क्रमांक ४० व ४१ च्या बांधावरून शेतरस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी करत ९ जुलै रोजी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, धानोरा यांच्याकडे अर्ज दाखल केला. त्यानंतर १४ जुलै रोजी मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेताची पाहणी केली.
पाहणीदरम्यान सर्वे क्रमांक ४० मधील जमीन कुमरे यांच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा अर्जदाराने केला आहे. मात्र, गैरअर्जदार मारोती बावणे यांनी संबंधित जमिनीवर आपला ताबा असल्याचे सांगून ट्रॅक्टर जाण्यास विरोध केल्याचे कुमरे यांचे म्हणणे आहे. मंडळ अधिकाऱ्यांच्या अहवालातही जमीन कुमरे यांच्या मालकीची असून संबंधित व्यक्ती रस्ता देण्यास तयार नसल्याचे नमूद असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
नोटीस प्रक्रियेत विलंबाचा आरोप
रस्त्याच्या प्रश्नावर पुढील कार्यवाहीसाठी २८ ते ३० जुलैदरम्यान संयुक्त बांधावरून नव्याने अर्ज साद करण्यात आला. त्यानुसार ४ ऑगस्ट रोजी सुधारित नमुन्यातील अर्जावर नोटीस बजावण्यात आली. मात्र, ७ ते १० ऑगस्टदरम्यान नोटीस संबंधितांपर्यंत वेळेत पोहोचली नसल्याने सुनावणीची प्रक्रिया रखडल्याचा आरोप अर्जदाराने केला आहे.
१३ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयात सुनावणी झाली. मात्र, त्यावेळी अंतिम निर्णय न देता प्रत्यक्ष घटनास्थळाची पुन्हा पाहणी करण्याची पुढील तारीख निश्चित करण्यात आल्याचे कुमरे यांनी सांगितले. त्यामुळे निर्णय आणखी लांबण्याची शक्यता निर्माण झाली असून, रोवणीचा हंगाम संपत आल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे.
ट्रॅक्टरअभावी रोवणी अडली
अविनाश कुमरे यांचे वडील अपंग असल्याने शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर करणे आवश्यक आहे. मात्र, शेतात जाण्यासाठी मार्गच उपलब्ध नसल्याने ट्रॅक्टर शेतापर्यंत पोहोचत नाही. परिणामी धान रोवणीची कामे रखडली असून वेळेत रस्ता उपलब्ध न झाल्यास संपूर्ण शेती पडीक राहण्याची शक्यता कुमरे यांनी व्यक्त केली आहे.
तात्पुरता मार्ग देण्याची मागणी
अंतिम निर्णय होईपर्यंत धान रोवणीचा हंगाम लक्षात घेऊन तात्पुरता मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी प्रमुख मागणी कुमरे यांनी केली आहे. तसेच नोटीस बजावण्यात झालेल्या कथित दिरंगाईची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी आणि संबंधित सर्वे क्रमांकाच्या बांधावरून कायमस्वरूपी शेतरस्त्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
“मालकीचे कागदपत्रे हातात असूनही स्वतःच्या शेतात जाता येत नाही. धान रोवणीचा हंगाम संपत चालला आहे. प्रशासनाने केवळ तारखा न देता तातडीने मार्ग उपलब्ध करून न्याय द्यावा,” अशी आर्त मागणी अविनाश कुमरे यांनी केली आहे.
दरम्यान, पावसाळी हंगामाची निकड लक्षात घेऊन महसूल प्रशासनाने या प्रकरणात तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडूनही होत आहे.













