आश्रमशाळा बंद करून प्रश्न सुटणार नाही; जपतलाई प्रकरणात सर्व स्तरांवरील जबाबदारी निश्चित करा : दानवे

8

आश्रमशाळा बंद करून प्रश्न सुटणार नाही; जपतलाई प्रकरणात सर्व स्तरांवरील जबाबदारी निश्चित करा : दानवे
– विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळा, राज्यातील सर्व आश्रमशाळांची विशेष तपासणी करण्याची मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : जपतलाई येथील आश्रमशाळेतील सर्पदंशाच्या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी करून केवळ संस्थाचालकांवर कारवाई न करता आश्रमशाळांच्या देखरेखीची जबाबदारी असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करावी. आश्रमशाळा बंद करून प्रश्न सुटणार नाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळून व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज आहे, अशी भूमिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते तथा आमदार अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
दानवे यांनी शुक्रवारी जपतलाई येथे घटनास्थळी भेट देऊन आश्रमशाळेची पाहणी केली. तसेच मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर गडचिरोली येथे पत्रकार परिषदेत त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले.
१० ऑगस्टच्या पहाटे जपतलाई आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना सर्पदंश झाला होता. उपचारादरम्यान तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला असून, दोन विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर मुख्याध्यापक आणि अधीक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, आश्रमशाळांची नियमित पाहणी, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि मूलभूत सुविधांवर देखरेख करण्याची जबाबदारी असलेल्या प्रकल्प अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिकाही तपासली पाहिजे, असे दानवे म्हणाले.

८५० चौरस फुटांच्या खोलीत विद्यार्थिनींची गर्दी

जपतलाई आश्रमशाळेतील निवास व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करताना दानवे यांनी सांगितले की, सुमारे ८५० चौरस फुटांच्या खोलीत मोठ्या संख्येने विद्यार्थिनी राहत असल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले. विद्यार्थ्यांना पुरेशी जागा, सुरक्षित निवास, स्वच्छता आणि आवश्यक मूलभूत सुविधा मिळणे गरजेचे आहे. या सुविधांची नियमित तपासणी संबंधित यंत्रणेने केली होती का, याचीही चौकशी झाली पाहिजे.
जपतलाईकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था असल्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयापर्यंत पोहोचण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे आश्रमशाळांमधील आरोग्य व आपत्कालीन सुविधांसोबतच रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेचाही आढावा घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

शाळा बंद करण्याऐवजी प्रशासक नेमा

जपतलाई आश्रमशाळा बंद करण्याच्या निर्णयावर दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला. आश्रमशाळा बंद केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. त्याऐवजी आवश्यक असल्यास प्रशासक नेमून आश्रमशाळेची व्यवस्था सुधारावी, अशी मागणी त्यांनी केली.
आश्रमशाळांना मिळणारे अनुदान, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि त्यावरील खर्च याचीही तपासणी झाली पाहिजे. संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित पाहणी केली होती का, नियमांनुसार सुविधा उपलब्ध होत्या का आणि या घटनेत प्रशासकीय पातळीवर कोणाची कसूर झाली, याचा निष्पक्ष तपास करणे आवश्यक असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.

राज्यातील सर्व आश्रमशाळांची तपासणी करा

जपतलाईची घटना केवळ एका आश्रमशाळेपुरती मर्यादित न ठेवता गडचिरोलीसह राज्यातील सर्व शासकीय व खासगी आश्रमशाळांची विशेष तपासणी करण्यात यावी, अशी मागणी दानवे यांनी केली.
विद्यार्थ्यांना सुरक्षित निवास, स्वच्छता, आरोग्य सुविधा, पुरेसे कर्मचारी आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत की नाही, याची प्रत्यक्ष पाहणी करावी. त्रुटी आढळल्यास तातडीने सुधारणा करून जपतलाई प्रकरणात दोषी आढळणाऱ्या सर्व संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
पत्रकार परिषदेला जिल्हा प्रमुख पवन गेडाम, युवासेना राज्य पदाधिकारी शुभम सोरते, तालुका प्रमुख घनश्याम सोरते आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here