गडचिरोलीच्या विकासकार्याचा जागतिक सन्मान; बी. प्रभाकरन यांना ‘ग्लोबल पीस ऑनर्स’

7

गडचिरोलीच्या विकासकार्याचा जागतिक सन्मान; बी. प्रभाकरन यांना ‘ग्लोबल पीस ऑनर्स’
– पुरस्कार गडचिरोलीच्या जनतेला समर्पित; औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि सामाजिक योगदानाची दखल
The गडविश्व
मुंबई, दि. २२ : गडचिरोली जिल्ह्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांना ‘ग्लोबल पीस ऑनर्स २०२६’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे, त्यांनी हा पुरस्कार गडचिरोलीच्या जनतेला समर्पित केला.
मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया येथे दिव्याज फाउंडेशनच्या वतीने आयोजित सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह अभिनेता शाहरुख खान, रणवीर सिंह आणि अक्षय कुमार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
गडचिरोलीचा औद्योगिक विकास करताना स्थानिक युवकांना रोजगार, कौशल्य प्रशिक्षण, नागरिकांना आरोग्य सुविधा आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे हे कंपनीचे उद्दिष्ट असल्याचे प्रभाकरन यांनी सांगितले. स्थानिक जनतेचा विश्वास आणि सहकार्य हीच विकासाची खरी प्रेरणा असल्याचे नमूद करत त्यांनी हा पुरस्कार जिल्हावासीयांना अर्पण केला.
प्रभाकरन यांच्या नेतृत्वाखाली लॉयड्स मेटल्सने आतापर्यंत १७ हजार ५०० हून अधिक जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यात सुमारे ३ हजार महिलांचा समावेश आहे. तसेच गडचिरोलीत एकात्मिक पोलाद प्रकल्प उभारण्यासाठी २५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे नियोजन आहे.
कंपनीच्या बोडली येथील कौशल्य विकास अकादमीत एक हजाराहून अधिक युवकांना प्रशिक्षण देण्यात आले असून, कंपनीच्या माहितीनुसार त्यांना १०० टक्के रोजगार मिळाला आहे. आरोग्य उपक्रमांचा २ लाख ७६ हजारांहून अधिक नागरिकांना लाभ झाला आहे. शिक्षण क्षेत्रात २ हजार ५०० विद्यार्थी विविध उपक्रमांशी जोडले गेले आहेत. तसेच ३० हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठात प्रायोजित उच्च शिक्षणाची संधी देण्यात आली आहे.
याशिवाय ३५० हून अधिक शेतकऱ्यांना सहकार्य, आत्मसमर्पण केलेल्या ९६ हून अधिक नक्षलवादी व त्यांच्या कुटुंबीयांना रोजगार आणि महिलांसाठी वान्या गारमेंट सेंटरच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
औद्योगिक विकासासोबतच आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची दखल या पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #गडचिरोली #बीप्रभाकरन #LloydsMetals #GlobalPeaceHonours2026 #TheGadvishva

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here