छत्तीसगड सीमेलगतच्या गावांचा दळणवळणाचा प्रश्न सुटणार : सावंगा–मंगेवाडा पुलासाठी ५.९९ कोटी मंजूर
– आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन; पावसाळ्यातील संपर्क तुटण्याची समस्या मिटणार
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. २२ : गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि छत्तीसगड सीमेलगतच्या गावांचा दळणवळणाचा प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर आहे. सावंगा–मंगेवाडा मार्गावरील पुलाच्या बांधकामासाठी नाबार्ड-३१ अंतर्गत ५ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, २१ नोव्हेंबर रोजी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील दुर्गम भागातील विकासकामांना गती मिळत आहे. याच अनुषंगाने सावंगा ते मंगेवाडा मार्गावरील पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे.
या पुलामुळे पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांना बारमाही दळणवळणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांचा प्रवास, शेतमालाची वाहतूक तसेच नागरिकांची दैनंदिन ये-जा सुलभ होणार आहे. अनेक वर्षांपासूनची स्थानिक नागरिकांची मागणी पूर्णत्वास जात असल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
भूमिपूजनप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष साजण गुंडावार, ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, विजय कुमरे, जिल्हा महामंत्री डॉ. प्रकाश गेडाम, तालुका महामंत्री सुभाष धाईत, पवन येरमे, श्रीनिवास दुल्लमवार, नगरसेवक गटनेते संजय कुंडू, नगरसेवक मल्लिक बुधवानी, कालिदास लेंगगुरे, संतोष एक्का, अभिजित गाईन, कलिराम राऊत, अविनाश पोरेटी, प्रशांत राऊत, प्रशांत पेदापड्डीवार, गाव पाटील रमेश वालको, सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुरुषोत्तम मेश्राम, अनामिका श्रोते, लक्ष्मण गणेलवार, अशोक लडके, परशुराम तुमडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.













