सुरजागड खाणीत प्रथमोपचार अन् तांत्रिक कौशल्यांची स्पर्धा; २४० स्पर्धकांचा सहभाग
-४४ व्या मेटलिफेरस माइन्स सेफ्टी वीकअंतर्गत आयोजन; नागपूर रीजनमधील ६१ खाणींचे प्रतिनिधित्व
The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : खाण क्षेत्रातील सुरक्षितता अधिक बळकट करण्यासोबतच कर्मचाऱ्यांचे तांत्रिक कौशल्य आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची क्षमता तपासण्यासाठी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या सुरजागड लोहखनिज खाणीत ट्रेड टेस्ट आणि प्रथमोपचार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ४४ व्या मेटलिफेरस माइन्स सेफ्टी वीक २०२६ अंतर्गत आयोजित या स्पर्धेत नागपूर रीजन-I आणि रीजन-II मधील ६१ खाणींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या २४० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
सुरजागड लोहखनिज खाणीच्या क्रीडांगणावर पार पडलेल्या या स्पर्धेत सहभागी कर्मचाऱ्यांनी आपले तांत्रिक ज्ञान, प्रत्यक्ष कामातील कौशल्य आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्परतेने प्रतिसाद देण्याची क्षमता प्रदर्शित केली. खाण क्षेत्रात सुरक्षित कार्यपद्धतींचे पालन किती महत्त्वाचे आहे, याबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच विविध खाणींमधील कर्मचाऱ्यांना आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी या माध्यमातून मिळाली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे हेड्री झोनचे संचालक एन. जयप्रकाश यांनी सहभागी संघ आणि मान्यवरांचे स्वागत केले. तसेच स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही दिली. समितीचे सचिव जीवन हेडाऊ यांनी स्पर्धेची रूपरेषा आणि उद्दिष्टे स्पष्ट केली.
खाण सुरक्षा महासंचालनालयाच्या (DGMS) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देखरेखीखाली ही स्पर्धा पार पडली. नागपूर रीजन-I चे डेप्युटी डायरेक्टर ऑफ माइन्स सेफ्टी (DDMS) आर. सुधीर, तर रीजन-II चे के. श्रीनिवास आणि महेंद्रनाथ यांनी स्पर्धेच्या आयोजनावर देखरेख ठेवली.
समारोपप्रसंगी समितीचे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक टी. ए. भास्कर यांनी DGMS अधिकारी, सहभागी खाणींचे प्रतिनिधी आणि स्पर्धकांचे आभार मानले. त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभात विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना गौरविण्यात आले. सुरजागड लोहखनिज खाणीचे मोहसिन खान यांनी आभार प्रदर्शन केले.
खाण क्षेत्रातील अपघात टाळणे, सुरक्षित कामकाजाच्या पद्धतींचे पालन करणे आणि आपत्कालीन प्रसंगी तातडीने मदत उपलब्ध करून देणे, या दृष्टीने अशा स्पर्धांना विशेष महत्त्व आहे. या उपक्रमामुळे विविध खाणींमधील कर्मचाऱ्यांना कौशल्य प्रदर्शनासोबतच सुरक्षा आणि प्रथमोपचारविषयक अनुभवांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळाली.













