कोरची : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
– बेडगाव पोलिसांची तत्परता; नाकाबंदीत ट्रक पकडून चालकाला घेतले ताब्यात
The गडविश्व
ता.प्र/ कोरची, दि.२३ : कोरची शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्गावर अवजड वाहनांच्या वेगाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भरधाव मालवाहू ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका ४७ वर्षीय व्यक्तीला प्राण गमवावे लागले. रविवारी (२२ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता कोरची येथील पेट्रोल पंपासमोर हा भीषण अपघात घडला. सुंदरसिंग तुलाराम पुडो (रा. भीमपूर, ता. कोरची) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील बोटेकसा मार्गाने महाराष्ट्रात दाखल झालेला सीजी १२ बीडी ८८१२ क्रमांकाचा मालवाहू ट्रक कुरखेड्याच्या दिशेने जात होता. याचदरम्यान पेट्रोल पंपावरून दुचाकीने भीमपूरकडे निघालेल्या पुडो यांच्या वाहनाला ट्रकची जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की, पुडो यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळी न थांबता वाहनासह पळ काढला. मात्र, घटनेची माहिती मिळताच कोरची पोलिसांनी बेडगाव पोलीस मदत केंद्राला सतर्क केले. बेडगाव पोलिसांनी मार्गावर नाकाबंदी करत पसार होणाऱ्या ट्रकला अडविले आणि चालकाला ताब्यात घेतले. अपघाताचे घटनास्थळ कोरची पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने ट्रक व चालकाला कोरची पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले.
अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण कधी?
कोरची-कुरखेडा राज्य महामार्गावर अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. छत्तीसगडमधील बोटेकसा मार्गे कोरचीपर्यंत येणारा रस्ता अद्याप खडतर असून, त्याचे बांधकामही पूर्ण झालेले नाही. मात्र, कोरचीपासून पुढे चांगला डांबरी रस्ता मिळताच काही वाहनचालक वेगाने वाहने हाकत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अशा बेदरकार वेगामुळे अपघातांचा धोका वाढत असून, निष्पाप नागरिकांचे जीव जाण्यापूर्वी प्रशासनाने अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणावे, अशी मागणी होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews













