जमिनीबाबत निर्णयाचा अधिकार जमीनमालकालाच; विकासाच्या नावाखाली बळजबरी नको
– ‘चरखे के पास चर्चा’मध्ये वरिष्ठ पत्रकार अमेय तिरोडकर यांचा सरकारवर निशाणा
The गडविश्व
गडचिरोली, दि. १३ : विविध प्रकल्पांच्या नावाखाली सुरू असलेल्या भूसंपादनात जमीनमालकांची इच्छा व संमती डावलणे ही लोकशाहीची पद्धत नाही. जमिनीबाबत निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार मूळ जमीनमालकालाच आहे, असे प्रतिपादन वरिष्ठ पत्रकार अमेय तिरोडकर यांनी केले.
‘चरखे के पास चर्चा’ या लोकसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार रामदास मसराम, कार्यक्रमाचे नेतृत्व करणारे महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गडचिरोलीच्या विकासाचे चित्र मुंबईत वेगळ्या पद्धतीने रंगविले जात असले, तरी प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी आहे, असे सांगत तिरोडकर यांनी खनिज वाहतुकीवरही भाष्य केले. पूर्वी गडचिरोली म्हटले की हिरवेगार जंगल डोळ्यासमोर यायचे; मात्र आता वाळू व लोहखनिज वाहून नेणाऱ्या हजारो ट्रकांमुळे धूळ आणि प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे, असे ते म्हणाले.
स्थानिकांना केवळ क्षुल्लक कंत्राटी नोकऱ्या देण्याऐवजी उद्योगांमध्ये भूमिपुत्रांना सन्मानजनक वाटा मिळायला हवा. विमानतळासह विविध प्रकल्पांसाठी जमीन अधिग्रहण सुरू असताना ‘इथला शेतकरी खरंच विमानाने प्रवास करणार आहे का?’ असा सवाल करत विकासाच्या संकल्पनेचा पुनर्विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
गडचिरोलीतील शेतकरी जमीन वाचविण्यासाठी लोकशाही मार्गाने संघर्ष करीत आहे. महात्मा गांधींनीही अहिंसेचा मार्ग स्वीकारला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी लोकशाही मार्गाने सुरू असलेला संघर्ष कायम ठेवावा; या लढ्याला यश मिळेल, असा विश्वास तिरोडकर यांनी व्यक्त केला.
जंगल-शेतीवर आधारित उद्योगांची गरज
सुरजागडच्या नैसर्गिक संपत्तीचा संदर्भ देत तिरोडकर यांनी पर्यावरणाच्या किंमतीवर होणाऱ्या लोहखनिज उत्खननावर प्रश्न उपस्थित केला. नागरिकांचे जीव आणि पर्यावरण धोक्यात घालून खनिज उत्खननाचा अट्टाहास कशासाठी, असा सवाल त्यांनी केला.
गडचिरोलीतील नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश करण्याऐवजी जंगल व शेतीवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देणे, स्थानिकांना रोजगार आणि उद्योगांमध्ये योग्य सहभाग देणे आवश्यक आहे. भूमिपुत्रांना न्याय देऊन विकास साधला तरच गडचिरोलीत खरी उद्योगक्रांती घडेल, असे तिरोडकर यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाला कुसुम आलाम, डॉ. प्रणित जांभुळे, शशिकांत मडावी, शंकरराव सालोटकर, वसंत राऊत, नेताजी गावतुरे, राजेश ठाकूर, प्रशांत कोराम, प्रमोद भगत, राजेंद्र बुल्ले यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेकडो शेतकरी व नागरिक उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews













