बाबुरावजी मडावी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त २८ नोव्हेंबरला गडचिरोलीत आदिवासी साहित्य संमेलन
– खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते उद्घाटन; मातृभाषा, आदिवासी साहित्यावर मंथनासह कवी संमेलनाचे आयोजन
The गडविश्व
गडचिरोली, दि.२४ : लोकनेते आदिवासी रत्न बाबुरावजी मडावी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त गडचिरोली येथे २८ नोव्हेंबर रोजी नवोदित आदिवासी साहित्य परिषदेच्या पाचव्या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली आणि क्रांतिवीर नारायणसिंग उईके विकास समिती, ब्रह्मपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय भवन, एलआयसी रोड, आयटीआय चौक येथे हे संमेलन पार पडणार आहे. खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून, साहित्यिक, विचारवंत आणि अभ्यासकांची उपस्थिती राहणार आहे.
संमेलनाची सुरुवात सकाळी १० वाजता आयटीआय चौक ते संमेलनस्थळ अशा ग्रंथदिंडीने होईल. सकाळी ११ वाजता उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. आमदार डॉ. मिलिंद नरोटे सहउद्घाटक म्हणून उपस्थित राहतील. पालघर जिल्ह्यातील वसई येथील ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक प्रा. डॉ. सखाराम डाखोरे संमेलनाध्यक्षपद भूषविणार आहेत.
यावेळी माजी मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पहिले पालकमंत्री शिवाजीराव मोघे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष दिनेश बाबुराव मडावी आणि समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ज्येष्ठ कवयित्री कुसुमताई आलाम बीजभाषक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
संमेलनाच्या पहिल्या सत्रात बाबुरावजी मडावी यांच्या सामाजिक, साहित्यिक, राजकीय आणि लोकहिताच्या कार्याचा आढावा घेतला जाणार आहे. दुसऱ्या सत्रात आदिवासींच्या मातृभाषा, मौखिक साहित्याचे संवर्धन आणि चिकित्सा या विषयांवर साहित्यिक व अभ्यासक विचार मांडणार आहेत. या सत्रांचे अध्यक्षस्थान अनुक्रमे डॉ. संजया लोहकरे आणि प्रा. डॉ. राम वासेकर भूषविणार आहेत.
दुपारी ४ ते ६ या वेळेत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नीलकांत कुलसंगे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन रंगणार आहे. यात विविध कवी आपल्या कवितांचे सादरीकरण करणार आहेत.
आदिवासी समाजाचे साहित्य, संस्कृती, भाषा आणि वैचारिक परंपरेला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्यप्रेमी, आदिवासी बांधव, साहित्यिक, अभ्यासक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दरम्यान, गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेला कवयित्री कुसुमताई आलाम, डॉ. प्रवीण किलनाके, आशा वेलादी, निशा गेडाम, मंजु आत्राम, प्रमिला रामटेके, सुनीता उसेंडी, प्रियदर्शन मडावी आणि प्रा. अनिल होळी आदी उपस्थित होते.













