मानव–वन्यजीव संघर्ष कमी करणाऱ्या गडचिरोलीतील सर्पमित्रांचा ‘विदर्भ वीर पुरस्काराने’ गौरव

130

मानव–वन्यजीव संघर्ष कमी करणाऱ्या गडचिरोलीतील सर्पमित्रांचा ‘विदर्भ वीर पुरस्काराने’ गौरव
The गडविश्व
नागपूर, दि. ०५ : गडचिरोली जिल्ह्यात सर्पदंश प्रतिबंध, साप बचाव कार्य (रेस्क्यू) आणि प्रभावी जनजागृतीद्वारे मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सर्पमित्रांचा वाइल्ड लाईफ वेलफेअर सोसायटी, नागपूर यांच्या वतीने ‘विदर्भ वीर पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. हा सन्मान सोहळा नुकताच नागपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी अजय कुकडकर, सौरभ सातपुते, योगेश हजारे, अनुप म्हशाखेत्री, चेतन थोराक, शिवम जुवारे व करण मंगर या सर्पमित्रांची निवड करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून हे सर्पमित्र गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात घरांमध्ये, शेतशिवारात, शाळा, शासकीय कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी आढळणाऱ्या विषारी व बिनविषारी सापांचे सुरक्षित रेस्क्यू करून त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे कार्य करत आहेत.
वनविभागाशी समन्वय साधत सर्पदंशाच्या घटनांमध्ये तातडीची मदत, नागरिकांमध्ये भीती न पसरवता योग्य मार्गदर्शन, तसेच सापांविषयी पसरलेले गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती शिबिरांचे आयोजन हे सर्पमित्र सातत्याने करत आहेत. त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळे अनेक मानवी जीव वाचले असून पर्यावरणातील महत्त्वाचा घटक असलेल्या सर्पांचेही संरक्षण झाले आहे.
वाइल्ड लाईफ वेलफेअर सोसायटी, नागपूरच्या वतीने अशा धाडसी व समर्पित कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘विदर्भ वीर पुरस्कार’ दिला जात असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
पुरस्कार स्वीकारताना सर्पमित्रांनी सांगितले की, ‘साप हा पर्यावरणातील अत्यंत आवश्यक घटक आहे. त्यामुळे त्यांचे संरक्षण होणे काळाची गरज आहे. साप दिसल्यास नागरिकांनी घाबरून न जाता प्रशिक्षित सर्पमित्रांशी संपर्क साधावा,’ असे आवाहन त्यांनी केले.
या सोहळ्यास वन्यजीवप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, विविध जिल्ह्यांतील सर्पमित्र तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here