कोरची येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
– कार्यक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
The गडविश्व
ता. प्र / कोरची, दि. ०५ : शहरातील महात्मा फुले चौक येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व थोर महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोरची नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. हर्षलताई भैसारे या होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सौ. कांता मॅडम (शिक्षिका), सामाजिक कार्यकर्ते आशिष अग्रवाल, नंदू वैरागडे व शालिकराम कराडे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून हिरामण मोहुर्ले, केशव मोहुर्ले, विजय कावळे, मनीराम मोहुर्ले, हरिचंद्र गुरनुले, देवाजी मोहुर्ले, ऋषी मोहुर्ले, जीवन शेंडे, पांडुरंग कावळे, यादव खोब्रागडे, मुरलीधर रुखमोडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात सुनीता मोहुर्ले व त्यांच्या संचाने स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले. तसेच वंशिका मोहुर्ले हिने लावणी नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. मार्गदर्शन करताना वक्त्यांनी सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत स्त्री शिक्षणासाठी केलेले अपार कष्ट, संघर्ष व त्यांना सहन करावे लागलेले अत्याचार यांचा आढावा घेतला. आज स्त्री शिक्षणाची पायाभरणी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळेच शक्य झाली असून देशाच्या सर्वोच्च पदांवर स्त्रीशक्ती विराजमान असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक गौरव कावळे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले. सायंकाळी संपूर्ण शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली.
कार्यक्रमास महिलांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक गौरव कावळे यांनी केले, तर आभार मानसी वाढई यांनी मानले.














