माता व नवजात बाळाच्या मृत्यू प्रकरणी डॉ. किलनाके व डॉ. देवरा यांच्यावर कारवाई करा

78

माता व नवजात बाळाच्या मृत्यू प्रकरणी डॉ. किलनाके व डॉ. देवरा यांच्यावर कारवाई करा
– अमिता मडावी यांची पत्रकार परिषदेत मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : चामोर्शी तालुक्यातील जामगिरी येथील २७ वर्षीय जिजा हंसराज सातर आणि त्यांच्या नवजात बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने चामोर्शी ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उपचारात हलगर्जीपणा व विलंब झाल्याचा आरोप करत डॉ. किलनाके व डॉ. देवरा यांच्यावर चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अमिता मडावी यांनी केली.
२४ ऑगस्ट रोजी गडचिरोली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मडावी यांनी सांगितले की, जिजा सातर यांना २३ ऑगस्ट रोजी पहाटे प्रसूतीसाठी चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, गडचिरोलीला नेत असतानाच बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर महिलेची प्रकृतीही गंभीर झाली आणि काही तासांनी तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले. उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला.
वेळीच योग्य उपचार मिळाले असते तर माता आणि बाळाचे प्राण वाचले असते का, असा सवाल मडावी यांनी उपस्थित केला. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष वैद्यकीय चौकशी करून उपचारातील विलंब किंवा त्रुटीची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली.
चामोर्शी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांची उपलब्धता, प्रसूतीदरम्यानची आपत्कालीन उपचारव्यवस्था आणि गंभीर रुग्णांना रेफर करण्याची प्रक्रिया यांचीही सखोल तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली.
पत्रकार परिषदेला अमिता मडावी, मृतक महिलेचे पती हंसराज सातर, आई सोनिबाई कंगाले, जाऊ जिजाबाई लोनबले, नातेवाईक शरद काशिनाथ कस्तुरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here