चामोर्शीतील माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत
– उपचार व संदर्भनाचा घटनाक्रम जिल्हा शल्यचिकित्सकांकडून स्पष्ट
The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : चामोर्शी येथील प्रसूतीदरम्यान माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. समितीकडून संपूर्ण घटनाक्रमाची तपासणी सुरू असून, अहवालातील निष्कर्षांनुसार नियमानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी दिली.
सौ. जिजा हंसराज सातार (वय २७), रा. चामोर्शी, यांना २३ ऑगस्ट रोजी सकाळी ५ वाजता प्रसूतीसाठी ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी येथे दाखल करण्यात आले होते. प्राथमिक तपासणीत प्रसूती तेथे होणे शक्य असल्याचे दिसून आले. मात्र, सकाळी ९ वाजताच्या तपासणीत प्रसूती गुंतागुंतीची होण्याची शक्यता तसेच गर्भातील बाळाचे हृदयाचे ठोके मंद असल्याचे आढळले.
त्यामुळे सकाळी ११ वाजता मातेला पुढील उपचारासाठी महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे संदर्भित करण्यात आले. रुग्णवाहिकेसोबत वैद्यकीय अधिकारी व परिचारिका उपस्थित होते. तेथे तपासणीत मातेची प्रकृती गंभीर असून बाळाचे डोके अडकल्याचे निदर्शनास आले. तातडीने प्रसूती करण्यात आली; मात्र बाळ मृतावस्थेत असल्याचे आढळले.
प्रसूतीनंतर मातेला अतिरक्तस्राव सुरू झाल्याने तिची प्रकृती गंभीर झाली. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार करताना रक्त तसेच चार युनिट एफएफपी देण्यात आले. प्रकृती आणखी खालावल्याने इंट्यूबेशन करण्यात आले. पुढील उपचारासाठी सायंकाळी ७.३० वाजता तिला सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रात्री ९.५० वाजता तिचा मृत्यू झाला.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी समितीमार्फत सखोल तपासणी सुरू असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील निष्कर्षांनुसार नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे डॉ. वर्षा लहाडे यांनी स्पष्ट केले.













