खड्ड्यांनी महामार्गाची चाळण; दहा दिवसांत काम सुरू करा, अन्यथा सर्वपक्षीय आंदोलन
– गडचिरोली-धानोरा-मुरुमगाव राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था; ओव्हरलोड वाहतुकीवर कठोर कारवाईची मागणी
The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि. २५ : गडचिरोली-धानोरा-मुरुमगाव मार्गे छत्तीसगडला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली असून, हा मार्ग नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून ओव्हरलोड वाहतुकीवर नियंत्रण आणावे, अशी मागणी नागरिकांनी मंगळवारी (दि. २४) धानोरा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. दहा दिवसांत महामार्गाचे काम सुरू न केल्यास सर्वपक्षीय आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या मार्गावरून दररोज नागरिक, व्यापारी, रुग्णवाहिका तसेच अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. मात्र ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेचा सर्वाधिक फटका रुग्णवाहिकांना बसत असून, गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी नेताना वेळ लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
सर्पदंशाच्या घटनेनंतर प्रश्न ऐरणीवर
जपतलाई येथील सर्पदंशाच्या घटनेनंतर या मार्गाच्या दुरवस्थेचे गांभीर्य पुन्हा समोर आले. सर्पदंश झालेल्या मुलींना उपचारासाठी नेताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवासात विलंब झाल्याचा आरोप नागरिकांनी केला. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी महामार्गाची तातडीने दुरुस्ती आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
ओव्हरलोड वाहतुकीवर नियंत्रणाची मागणी
या मार्गावर खडी, मुरूम व गिट्टीची वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड वाहनांची दिवसरात्र वाहतूक सुरू असल्याने रस्त्याची आणखी दुरवस्था होत असल्याचा आरोप करण्यात आला. क्षमतेपेक्षा अधिक भाराची वाहतूक सुरू राहिल्यास रस्त्याचे नुकसान होऊन अपघाताचा धोका वाढत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
महामार्गाची गुणवत्तापूर्ण दुरुस्ती करावी, ओव्हरलोड वाहनांवर कठोर कारवाई करावी आणि खाणीमधून होणाऱ्या अवजड वाहतुकीवर नियंत्रण आणावे, अशी मागणी करण्यात आली.
दहा दिवसांत महामार्गाच्या कामाला सुरुवात न झाल्यास सर्वपक्षीय आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला.
पत्रकार परिषदेला राजू मोहुर्ले, विनोद लेनगुरे, ललित बरच्छा, अनंत साळवे, सारंग साळवे, जमीर कुरेशी, गोपी चौधरी, मुकाजी भेंडारे, साजन गुंडावार, गणेश कुळमेथे, नरेश चिमुरकर, भूषण भैसारे, सुभाष धाईत, रवी लेनगुरे, माणिकशहा मडावी, सर्फराज शेख, मुकेश बोडगेवार, बाळू उंदीरवाडे, पुष्पराज उंदीरवाडे, राकेश खरवडे, मयूर मशाखेत्री, वंश इंदूरकर, भास्कर सयाम, अल्का मशाखेत्री, शेवंता हलामी, देवांगना चौधरी, यामिना गुरनुले, विजय कुमरे, नंदू शेंद्रे, विष्णू हलधर, गजानन परचाके यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanora













