दिव्यांगांच्या हक्कांसाठी आशा कार्यकर्त्या सरसावल्या; जवळीत जाणीव-जागृती कार्यशाळा

59

दिव्यांगांच्या हक्कांसाठी आशा कार्यकर्त्या सरसावल्या; जवळीत जाणीव-जागृती कार्यशाळा
The गडविश्व
भिवापूर, दि. २५ : दिव्यांग व्यक्तींना आरोग्य सेवा, शासकीय सुविधा आणि विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आशा कार्यकर्त्यांनी गावपातळीवर सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन करण्यात आले. ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’, कुरखेडा यांच्या वतीने समुदाय आधारित दिव्यांग व्यक्ती पुनर्वसन प्रकल्प (CBR) अंतर्गत जवळी प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा कार्यकर्त्यांसाठी दिव्यांग संवेदनशीलता व जाणीव-जागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

भिवापूर तालुक्यातील जवळी PHC अंतर्गत विविध गावांतील आशा कार्यकर्त्यांनी कार्यशाळेत सहभाग घेतला. जिल्हा समन्वयक प्रितम नानवटे यांनी CBR प्रकल्पाची माहिती देत गावातील दिव्यांग व्यक्तींची ओळख, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांना आवश्यक सेवा व शासकीय योजनांशी जोडण्याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत दिव्यांगत्वाची प्राथमिक ओळख, दिव्यांग प्रमाणपत्र, UDID कार्ड तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळविण्याची प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. गावातील एकही पात्र दिव्यांग व्यक्ती शासकीय सुविधांपासून वंचित राहू नये, यासाठी आशा कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करावे, असे आवाहन करण्यात आले.

तालुका आरोग्य सहाय्यक अशोक हेडाऊ यांनी दिव्यांग व्यक्तींना आवश्यक आरोग्य सेवा व शासकीय सुविधांशी जोडण्याची गरज व्यक्त केली. आरोग्य सहाय्यक केशव चंदनखेडे व सोमकुवर यांनीही दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र, UDID कार्ड आणि योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

डॉ. ऋतुजा ठोकळ, मेडिकल ऑफिसर, जवळी PHC यांनी दिव्यांग व्यक्तींच्या आरोग्यविषयक गरजा समजून घेऊन त्यांना वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदर्शन केले. दिव्यांग व्यक्तींशी संवाद साधताना संवेदनशीलता आणि सन्मानाची भूमिका ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

आशा फॅसिलेटर विशाखा भोयर व विद्या धुर्वे यांनी गावागावांत दिव्यांग व्यक्तींची ओळख करून त्यांना आवश्यक सेवांशी जोडण्यासाठी आशा कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. LHV समन्वयक, कुष्ठरोग पर्यवेक्षक रामटेके यांच्यासह उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही मार्गदर्शन केले.

यावेळी “प्रत्येक पात्र दिव्यांग व्यक्तीला प्रमाणपत्र व UDID कार्ड मिळवून देऊ आणि कोणतीही व्यक्ती शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही,” असा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

कार्यशाळेचे सूत्रसंचालन व प्रस्तावना धम्ममाला टेटु यांनी केली, तर तालुका समन्वयक छाया तळमले यांनी आभार मानले. दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरोग्य विभाग, आशा कार्यकर्त्या आणि CBR प्रकल्पाच्या माध्यमातून समन्वयाने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here