११ मे पासून गडचिरोलीत उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराला सुरुवात
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०७ : जिल्ह्यातील क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषद, गडचिरोली यांच्या वतीने ११ मेपासून विशेष क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दोन टप्प्यांत पार पडणार असून पहिला टप्पा ११ ते २० मे २०२६ आणि दुसरा टप्पा २१ ते ३० मे २०२६ दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे.
शिबिराचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडा व सांस्कृतिक भवन (कॉम्प्लेक्स एरिया), क्रीडा प्रबोधिनी, गडचिरोली तसेच जिल्हा स्टेडियम, पोटेगाव रोड येथे करण्यात आले आहे. दररोज सकाळी ५.३० ते ८.०० आणि सायंकाळी ५.३० ते ८.०० या वेळेत प्रशिक्षण सत्रे घेण्यात येणार आहेत.
या प्रशिक्षण शिबिरात १० वर्षांवरील सर्व मुला-मुलींना सहभाग घेता येणार असून कुस्ती, व्हॉलीबॉल, मैदानी खेळ, बॉक्सिंग, खो-खो, कबड्डी आणि बॉल बॅडमिंटन या विविध खेळांचे प्रशिक्षण अनुभवी व तज्ज्ञ क्रीडा मार्गदर्शकांकडून दिले जाणार आहे.
शिबिरात सहभागी होण्यासाठी इच्छुक खेळाडू व विद्यार्थ्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात उपलब्ध विहित नमुन्यात ८ मे २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू आणि विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.













