गडचिरोली : महिला लोकशाही दिन १८ मे रोजी

48

गडचिरोली : महिला लोकशाही दिन १८ मे रोजी
– समस्याग्रस्त महिलांना थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडता येणार गाऱ्हाणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०७ : महिलांच्या विविध समस्या, अडी-अडचणी व गाऱ्हाण्यांचे तातडीने निराकरण व्हावे तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत येत्या १८ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात महिला लोकशाही दिन पार पडणार आहे.
महिलांना त्यांच्या वैयक्तिक समस्या थेट प्रशासनासमोर मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो. यावेळी विविध शासकीय विभागांशी संबंधित महिलांच्या तक्रारी, गाऱ्हाणी व समस्या ऐकून त्यांचे लेखी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
मात्र न्यायप्रविष्ट प्रकरणे, सेवा विषयक व आस्थापना संदर्भातील बाबी, तसेच विहित नमुन्यात नसलेले अथवा आवश्यक कागदपत्रांशिवाय सादर करण्यात आलेले अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अर्ज वैयक्तिक स्वरूपाचे असणे आवश्यक असून आवश्यक कागदपत्रांसह तीन प्रतींमध्ये सादर करावेत, असेही सांगण्यात आले आहे.
अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बॅरेक क्रमांक १, खोली क्रमांक २६ व २७, कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आला आहे.
पीडित व समस्याग्रस्त महिलांनी आपल्या तक्रारी व अर्ज वेळेत सादर करून महिला लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here