17 ते 20 मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज
– शेतकऱ्यांना खबरदारीचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. १३ : राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांची सुरक्षित साठवण करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
सध्याच्या प्राथमिक अंदाजानुसार या कालावधीत दुपारनंतर वातावरण ढगाळ होऊन मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दिसून येऊ शकते.
तसेच या काळात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता देखील नाकारता येत नसल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. विशेषतः 18 ते 20 मार्च दरम्यान हवामानातील या घडामोडी अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, सध्या राज्यात रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी हवामानाच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवून शेतीची कामे नियोजित करावीत. काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी, तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपिटीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #krushi #MaharashtraWeather #UnseasonalRain #ThunderstormAlert #FarmerAlert #WeatherUpdate #RabiCrops #AgricultureNews #MaharashtraFarmers #StormWarning #RainAlert














