पेंढरी रोडवर भरधाव कार पलटली ; सहकारी बँकेचे दोन कर्मचारी गंभीर जखमी
The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि. ०७ : गडचिरोलीहून पेंढरीकडे जात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात सहकारी बँकेचे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवार (दि. ६ जुलै) रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पेंढरी गावाजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पेंढरी येथील को-ऑपरेटिव्ह बँकेचे कर्मचारी दररोज गडचिरोलीहून कारने ये-जा करतात. सोमवारी सकाळी बँकेचे चार कर्मचारी तसेच पेंढरी येथील तलाठी हे एमएच-३४-व्ही-३६१० क्रमांकाच्या टाटा मोटर्सच्या कारने कर्तव्यावर जात होते. पेंढरी गावाजवळ आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला पलटी झाली.
या अपघातात बँकेचे कर्मचारी दिनकर कोडाप आणि सुभाष पेंदाम हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच बँकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने उपचारासाठी गडचिरोली येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. इतर प्रवासी किरकोळ दुखापतींसह सुखरूप बचावले असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.













