जादूटोणा व अंधश्रद्धेविरोधात जिल्हाभर जनजागृती ; ७ ते ९ जुलैदरम्यान गडचिरोली, आरमोरी व देसाईगंज येथे प्रबोधन कार्यक्रम
The गडविश्व
गडचिरोली, दि. ६ : जादूटोणा विरोधी कायदा, अंधश्रद्धा निर्मूलन आणि समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने ७ ते ९ जुलैदरम्यान गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज येथे विशेष प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये जादूटोणा प्रतिबंधक कायद्याची माहिती, अंधश्रद्धेचे दुष्परिणाम, विवेकवादी विचारांचा प्रसार आणि नागरिकांची कायदेशीर जबाबदारी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या प्रबोधन कार्यक्रमांना श्रीकृष्णा शालीकराम धोटे, प्रबोधनकार तथा श्री संत गाडगेबाबा विचार प्रबोधन बहुउद्देशीय संस्था, गाडगेनगर (अमरावती) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून अंधश्रद्धेविरोधात जनजागृती करून समाजात वैज्ञानिक विचारसरणी दृढ करण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमांच्या वेळापत्रकानुसार, ७ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता पीएमश्री जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा, रामनगर (गडचिरोली), ८ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता नगर परिषद सभागृह, आरमोरी आणि ९ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता नगर परिषद सभागृह, देसाईगंज येथे प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक परिवर्तन आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.













