शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची साईडिंग अपूर्ण ; खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका
– ज्येष्ठ नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०६ : ग्रामपंचायत मुरखळा अंतर्गत नवेगाव (कॉम्प्लेक्स) येथील सुयोगनगर परिसरातून वियाणी विद्या निकेतनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अपूर्ण कामामुळे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंची साईडिंग अद्यापही भरण्यात आलेली नसल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिक संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
फेब्रुवारी २०२६ मध्ये सुमारे ८० मीटर लांबीचा हा रस्ता बांधण्यात आला. मात्र संबंधित कंत्राटदाराने रस्त्याच्या दोन्ही कडांची साईडिंग मुरूम किंवा गिट्टीने भरलेली नसल्याने रस्ता अरुंद झाला आहे. परिणामी शाळेच्या वेळेत समोरासमोर येणाऱ्या दोन वाहनांना एकाच वेळी मार्ग काढणे कठीण होत असून वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
याशिवाय या रस्त्यालगत सुमारे दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या आणखी १०० मीटरच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरून दररोज शेकडो शाळकरी विद्यार्थ्यांची ये-जा होत असल्याने अपघाताची शक्यता वाढली असून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
या गंभीर समस्येची दखल घेऊन ज्येष्ठ नागरिक संस्था, गडचिरोली तालुकाच्या वतीने सोमवार, दि. ६ जुलै २०२६ रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. संबंधित यंत्रणेला तातडीने रस्त्याच्या साईडिंगचे काम पूर्ण करण्यासह खड्ड्यांची दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
निवेदन देताना ज्येष्ठ नागरिक संस्था, गडचिरोली तालुक्याचे अध्यक्ष एच. ए. पठाण, सचिव प्रभाकर कुबडे, उमेश आखाडे, जयदेव चिचघरे तसेच जिल्हा शाखेचे सचिव सुधाकर बावणे उपस्थित होते.













