तीन ग्रामसभांना दांडी, हिशोबही नाही ; चातगावचे ग्रामपंचायत अधिकारी राठोड यांच्यावर निलंबनाची कारवाई

40

तीन ग्रामसभांना दांडी, हिशोबही नाही ; चातगावचे ग्रामपंचायत अधिकारी राठोड यांच्यावर निलंबनाची कारवाई
– जिल्हा परिषद सीईओ सुहास गाडे यांचा दणका; चौकशीसाठी एटापल्ली मुख्यालय निश्चित
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. १२ : ग्रामपंचायतीच्या कामकाजातील कथित अनियमितता, ग्रामस्थांना हिशोब सादर न करणे आणि सलग तीन ग्रामसभांना अनुपस्थित राहिल्याच्या तक्रारींची दखल घेत जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी चातगाव येथील ग्रामपंचायत अधिकारी रणजीत जयसिंग राठोड यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले. या कारवाईमुळे पंचायत विभागातील प्रशासकीय कामकाजाबाबत चर्चेला उधाण आले आहे.
धानोरा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या चातगाव ग्रामपंचायतीचे अधिकारी रणजीत राठोड यांच्याविरोधात मनमानी कारभार, अनियमितता आणि गैरव्यवहारासंदर्भात तक्रारी करण्यात आल्या होत्या. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा हिशोब मागितला असता तो सादर करण्यात आला नसल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच तीन ग्रामसभांना अनुपस्थित राहणे आणि ग्रामसभेत हिशोब सादर न केल्याचेही आरोप करण्यात आले होते.
या तक्रारींच्या अनुषंगाने ग्रामपंचायत चातगाव येथील दप्तराची तपासणी करून पुढील चौकशी करण्याच्या दृष्टीने राठोड यांच्यावर महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम, १९६४ मधील तरतुदींनुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

निलंबन काळात एटापल्ली मुख्यालय

चौकशीदरम्यान कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी निलंबनाच्या कालावधीत राठोड यांचे मुख्यालय पंचायत समिती एटापल्ली येथे निश्चित करण्यात आले आहे. त्यांना ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारनंतर मूळ पदस्थापनेच्या ठिकाणाहून कार्यमुक्त करण्यात आल्याची माहिती आहे.

चातगाव ग्रामपंचायतीचा पदभार प्रवीण दुर्गे यांच्याकडे

ग्रामपंचायत अधिकारी राठोड यांच्या निलंबनानंतर चातगाव ग्रामपंचायतीचे कामकाज सुरळीत सुरू राहावे आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था केली आहे. फुलबोडी ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण दुर्गे यांच्याकडे चातगाव ग्रामपंचायतीचा पदभार सोपविण्यात आला आहे. धानोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शांतीरक्षक वानखेडे यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

तक्रारींच्या अनुषंगाने कारवाई

ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता राखणे, ग्रामसभेला उत्तरदायी राहणे आणि नागरिकांना आवश्यक हिशोब उपलब्ध करून देणे ही संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. चातगाव येथील प्रकरणात प्राप्त तक्रारींच्या आधारे निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, पुढील चौकशीतून प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice
#Gadchiroli #Dhanora #Chatgaon #SuspensionAction #ZillaParishad #GramPanchayat #AdministrativeAction #TheGadvishva

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here