गडचिरोलीत सायबर फसवणुकीचे दोन गुन्हे उघड; तिघांना अटक
– सात तरुणींच्या बँक खात्यांतून १ कोटी ४ लाखांचे व्यवहार; बनावट बेडशीट जाहिरातीद्वारेही फसवणूक
The गडविश्व
गडचिरोली, दि. १३ : ऑनलाइन फसवणुकीच्या दोन स्वतंत्र प्रकरणांचा छडा लावत गडचिरोली पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. सात तरुणींच्या बँक खात्यांचा गैरवापर करून १ कोटी ४ लाख रुपयांहून अधिक रकमेचे व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. दुसऱ्या प्रकरणात फेसबुकवरील बनावट बेडशीट जाहिरातीद्वारे ग्राहकाची फसवणूक करण्यात आली.
पहिल्या प्रकरणात जुही विनायक मेश्राम हिने ट्रेडिंगसाठी बँक खाते आवश्यक असल्याचे सांगून सात तरुणींच्या नावे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खाती उघडली. त्यांच्या नावे सिमकार्ड खरेदी करून ती बँक खात्यांशी जोडली. तसेच पासबुक आणि एटीएम कार्ड स्वतःकडे घेतले. ६ ऑक्टोबर रोजी बँकेकडून व्यवहारांबाबत नोटीस आल्यानंतर खात्यांतून १ कोटी ४ लाख रुपयांहून अधिक रकमेचे व्यवहार झाल्याचे उघड झाले. तपासादरम्यान जुहीसह सात्विक दीपक सावडिया यालाही अटक करण्यात आली. न्यायालयाने दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दुसऱ्या प्रकरणात फेसबुकवर ‘Sajja Handloom’ आणि ‘PP Collection’ या नावांनी बेडशीट विक्रीच्या जाहिराती देण्यात आल्या. फिर्यादीने ऑनलाइन १ हजार ५५० रुपये भरले; मात्र माल मिळाला नाही. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी राजस्थानमधील साहिल जमशेद ऊर्फ साहिल जमशेद खान याला अटक केली. १२ ऑक्टोबर रोजी त्याला गडचिरोली येथे आणण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
अनोळखी ऑनलाइन विक्रेत्यांना पैसे पाठवण्यापूर्वी खात्री करा. आपले बँक खाते, एटीएम कार्ड, सिमकार्ड किंवा कागदपत्रे इतरांना वापरण्यास देऊ नका. ऑनलाइन फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन गडचिरोली पोलिसांनी केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice












