CPI च्या पाठपुराव्याला यश; कोइंदुळ गावात नालेसफाई सुरू

13

CPI च्या पाठपुराव्याला यश; कोइंदुळ गावात नालेसफाई सुरू
– निवेदनानंतर प्रशासनाकडून कार्यवाही
The गडविश्व
एटापल्ली, दि. १३ : तालुक्यातील ग्रामपंचायत चोकेवाडा अंतर्गत येणाऱ्या कोइंदुळ गावातील नालेसफाईच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. नाल्यांमध्ये साचलेला कचरा, गाळ आणि सांडपाण्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेत भारतीय कम्युनिस्ट पार्टीने (CPI) प्रशासनाकडे पाठपुरावा केला. या पाठपुराव्यानंतर नालेसफाईचे काम सुरू झाल्याने गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
कोइंदुळ गावातील नाल्यांमध्ये कचरा आणि गाळ साचल्यामुळे सांडपाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण होत होते. यामुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत होता. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गावकऱ्यांनी बैठक आयोजित करून CPI च्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केले आणि नालेसफाईसाठी पुढाकार घेण्याची मागणी केली.
गावकऱ्यांची समस्या जाणून घेत CPI च्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समिती एटापल्लीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले. तसेच नालेसफाईचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली. या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली आहे.

यावेळी CPI चे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले, “नागरिकांच्या समस्या सोडविणे हे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे मुख्य उद्दिष्ट आहे. कोइंदुळ येथील नागरिकांनी नालेसफाईच्या समस्येबाबत मदत मागितल्यानंतर आम्ही प्रशासनाकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा केला. त्यानंतर कामाला सुरुवात झाली, ही समाधानाची बाब आहे. नागरिकांच्या हक्कांसाठी आणि गावातील मूलभूत समस्या सोडविण्यासाठी CPI यापुढेही जनतेसोबत राहून संघर्ष करेल.”
दरम्यान, नालेसफाईचे काम पूर्ण करावे, सांडपाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी उपाययोजना कराव्यात, डास प्रतिबंधक फवारणी करावी आणि गावात नियमित स्वच्छता राखावी, अशी मागणी CPI पदाधिकारी व गावकऱ्यांनी केली आहे.
या पाठपुराव्यात CPI चे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सदस्य कॉ. सुरज जक्कुलवार यांच्यासह कोइंदुळ गावातील नागरिक सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here