सोनसरी आश्रमशाळा विद्यार्थिनी आत्महत्या प्रकरण : अधीक्षिकेच्या निलंबनासह गुन्हा दाखल करण्याचे आदिवासी विकास मंत्र्यांचे निर्देश
-पीडित कुटुंबाला दोन लाखांचे अनुग्रह अनुदान
The गडविश्व
ता. प्र/कुरखेडा, दि. १३ : कुरखेडा तालुक्यातील सोनसरी येथील शासकीय आश्रमशाळेच्या वसतिगृहात आठवीत शिकणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थिनी राणू कृष्णा हलामी हिच्या आत्महत्येच्या घटनेची आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधीक्षिकेला तात्काळ निलंबित करण्यासह तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांचे अनुग्रह अनुदान देण्यात आले आहे.
घटनेनंतर मंत्री डॉ. उईके यांनी कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन करून घटनेची माहिती जाणून घेतली. या प्रकरणात कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी आश्रमशाळा प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत संबंधितांची जबाबदारी निश्चित करून आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
आईला नोकरी व निवासाची सोय करण्याचे निर्देश
मृत विद्यार्थिनीच्या आईला त्याच आश्रमशाळेत काम देण्यासह आश्रमशाळेच्या परिसरात निवासाची व्यवस्था करण्याचे निर्देशही मंत्र्यांनी दिल्याची माहिती आहे. मुलीच्या मृत्यूमुळे संकटात सापडलेल्या कुटुंबाला आर्थिक आणि निवासाचा आधार मिळावा, या दृष्टीने या निर्णयाला महत्त्व आहे.
दरम्यान, पीडित कुटुंबीयांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत दोन लाख रुपयांचा धनादेश अनुग्रह अनुदान म्हणून देण्यात आला. मात्र, कुटुंबीयांनी यापूर्वी मागणी केलेल्या ५० लाख रुपयांच्या नुकसानभरपाईबाबत शासनाची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.
आश्रमशाळांच्या व्यवस्थेचा नियमित आढावा घेणार
गडचिरोली प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय आश्रमशाळांचा नियमित आढावा घेण्याचे निर्देश डॉ. उईके यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले. मुख्याध्यापक तसेच अधीक्षक आणि अधीक्षिकांशी नियमित संपर्क ठेवून शाळा व वसतिगृहांतील परिस्थितीची माहिती घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
यापुढे आश्रमशाळांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्यास संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि प्रशासनाच्या जबाबदारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
राणूच्या मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष उच्चस्तरीय चौकशी करावी, संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि कुटुंबाला ५० लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या प्रकरणात अधीक्षिकेच्या निलंबनासह गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले असले, तरी प्रत्यक्ष कारवाईची अधिकृत पुष्टी होणे आवश्यक आहे.
यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण एम., माजी आमदार कृष्णाजी गजबे, माजी आमदार नामदेवराव उसेंडी, चांगदेव फाये तसेच संबंधित शासकीय अधिकारी उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews #sonsari #ashramschool












