देवासर्रा–मेढा रस्त्याची दुरवस्था; आश्वासन नको, पक्का रस्ता हवा

34

देवासर्रा–मेढा रस्त्याची दुरवस्था; आश्वासन नको, पक्का रस्ता हवा
– डांबरीकरण उखडले, गिट्टी-धुळीचा त्रास वाढला
The गडविश्व
ता. प्र /धानोरा, दि. १२ : तालुक्यातील देवासर्रा ते मेढा या महत्त्वाच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, नागरिकांना वर्षानुवर्षे खडतर प्रवास करावा लागत आहे. अनेक लोकप्रतिनिधी आले आणि गेले, मात्र या मार्गावरील रस्त्याचा प्रश्न अद्यापही कायम आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, रस्त्याचे तातडीने पक्क्या रस्त्यात रूपांतर करण्याची मागणी जोर धरत आहे.
देवासर्रा–मेढा मार्गावरील डांबरीकरण पूर्णपणे उखडले असून, अनेक ठिकाणी गिट्टी आणि धूळ उघडी पडली आहे. परिणामी, या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्डे, उखडलेले डांबर आणि पसरलेल्या गिट्टीमुळे अपघाताचा धोका वाढला असून, प्रवास करताना नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागत आहे.
या रस्त्याच्या सुधारणेबाबत अनेक वर्षांपासून अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. मात्र, प्रत्यक्ष काम होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. केवळ आश्वासने देण्याऐवजी रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने देवासर्रा–मेढा रस्त्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्याचे दर्जोन्नतीकरण, मजबुतीकरण आणि पक्के डांबरीकरण तातडीने करावे, अशी ठाम मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. आता तरी प्रशासन या प्रश्नाची दखल घेऊन नागरिकांना दिलासा देणार का, याकडे परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here