आंधळी नवरगावात बालग्राम सभा उत्साहात; ६५ विद्यार्थ्यांनी मांडले गावाचे प्रश्न

30

आंधळी नवरगावात बालग्राम सभा उत्साहात; ६५ विद्यार्थ्यांनी मांडले गावाचे प्रश्न
– शिक्षण, बससेवा, क्रीडा सुविधांसह बालसंरक्षणावर चर्चा
The गडविश्व
ता. प्र /कुरखेडा, दि.११ : बालकांच्या हक्कांना व्यासपीठ मिळवून देत त्यांच्या समस्या ग्रामविकासाच्या नियोजनात समाविष्ट करण्याच्या उद्देशाने गट ग्रामपंचायत आंधळी नवरगाव येथे बालग्राम सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत ६५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत शिक्षण, वाहतूक, क्रीडा सुविधा आणि बालसंरक्षणासह गावातील विविध समस्यांकडे लक्ष वेधले. यावेळी विद्यार्थ्यांमधून रुद्र किशोर कराडे यांची सभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
ग्रामविकास अधिकारी कन्नाके यांच्या उपस्थितीत सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांना आपल्या समस्या मांडण्यासाठी आणि ग्रामविकासाच्या निर्णयप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी या सभेच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून देण्यात आली.

विद्यार्थ्यांनी मांडले मूलभूत सुविधांचे प्रश्न

बालग्राम सभेत शाळेतील वर्गखोल्यांचे बांधकाम, विद्यार्थ्यांसाठी बससेवेची सुविधा, मुख्य रस्त्याची दुरुस्ती व रुंदीकरण, क्रीडांगणाची उपलब्धता, क्रीडा साहित्य आणि व्यायामशाळेची गरज यांसारखे महत्त्वाचे विषय मांडण्यात आले. याशिवाय गावातील पथदिवे, सार्वजनिक शौचालयांमध्ये पाण्याची व्यवस्था आणि ग्रामस्वच्छता अभियान राबविण्याबाबतही चर्चा झाली.
ग्रामपंचायत विकास आराखड्यात (GPDP) बालकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्याची गरजही यावेळी अधोरेखित करण्यात आली.
‘कुटुंब सक्षमीकरण आणि कुटुंब आधारित पर्यायी काळजी’ या प्रकल्पांतर्गत गावात ग्राम बाल संरक्षण समिती आणि बाल पंचायत स्थापन करण्यात आली आहे. मिरॅकल फाउंडेशनच्या प्रकल्पांतर्गत ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या कुरखेडा येथील संस्थेच्या वतीने गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या क्षेत्रात काम सुरू आहे.
बालकांचे हक्क जपणे, त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे, कुटुंबांचे सक्षमीकरण करणे आणि बालकांच्या समस्या प्रभावीपणे सोडविण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या सभेला माजी सरपंच उज्वला रायसिडाम, माजी उपसरपंच अप्रव भैसारे, माजी सरपंच उद्धव पाटील कवाडकर, माजी ग्रामपंचायत सदस्य नानाजी खुणे, ग्रामपंचायत सदस्य सीमा सयाम व जगदीश मानकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संघमित्रा कराडे, कॅडर रोशनी लाडे, तालुका समन्वयक माया कोचे, जिल्हा समन्वयक सुप्रिया बन्सोड, कॅडर जयश्री लाडे, ICRDच्या सुजाता कराडे, माजी विद्यार्थिनी वैष्णवी सयाम, ग्रामपंचायत कर्मचारी घनश्याम उईके व माधुरी सयाम तसेच विद्यार्थी प्रतिनिधी चेतन लाडे, मयुरी ठलाल आणि हार्दिक जांभुळकर उपस्थित होते.
बाल पंचायत सदस्य, ग्राम बाल संरक्षण समितीचे सदस्य आणि विद्यार्थ्यांनीही सभेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
बालकांच्या समस्या आणि गरजा ग्रामविकासाच्या नियोजनात समाविष्ट करून त्यांच्या शिक्षणासह सुरक्षितता व सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याचा महत्त्वपूर्ण संदेश या बालग्राम सभेतून देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here