कुरखेड्याच्या संगीता ठलाल यांना ‘माझी मी भारी’ नारी सन्मान जाहीर
– ३२ वर्षांची साहित्यसेवा, रानभाज्यांवरील संशोधन आणि सामाजिक कार्याची दखल
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. ११ : साहित्य, रानभाज्यांवरील संशोधन आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून ग्रामीण भागात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कुरखेडा तालुक्यातील संगीता संतोष ठलाल यांना नाशिक येथील इनोव्हेटिव्ह मेकर्स अकॅडमी फाउंडेशनतर्फे प्रतिष्ठेचा ‘माझी मी भारी’ नारी सन्मान जाहीर झाला आहे. येत्या १८ ऑक्टोबरला नाशिक येथील राणी भवन, पंचवटी येथे मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
मूळच्या देऊळगाव येथील संगीता ठलाल या शेतकरी आणि गृहिणी असून, गेल्या ३२ वर्षांपासून साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत. गेल्या आठ वर्षांपासून त्या सामाजिक क्षेत्रातही निःस्वार्थपणे योगदान देत आहेत. मानवी आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या रानभाज्यांचा अभ्यास करून त्यांनी ‘रानभाज्यांच्या जगात’ हा संशोधन ग्रंथ लिहिला. रानभाज्यांविषयी माहिती संकलित करून ती समाजापर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा हा प्रयत्न विशेष उल्लेखनीय आहे.
झाडीबोलीचे संवर्धन व्हावे आणि या बोलीभाषेतील साहित्याला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने त्यांनी ‘झाडीचा खाजा’ हा झाडीबोली काव्यसंग्रहही लिहिला आहे. आजवर त्यांनी ६४ वृत्तपत्रांत लेखन केले असून, त्यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्याची दखल आकाशवाणी नागपूर आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीने घेतली आहे. भारत सरकारच्या साहित्य अकादमी, दिल्ली यांच्या वतीने चांदाळा येथील आश्रमशाळेत आयोजित ‘ग्रामलोक’ कार्यक्रमात तसेच जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवातही त्यांचे कथन झाले आहे.
त्यांच्या कार्यासाठी शासकीय आणि विविध संस्थांकडून आतापर्यंत ११३ वेळा सत्कार करण्यात आला असून, त्यांच्या संशोधन ग्रंथालाही पुरस्कार प्राप्त झाले आहेत. साहित्यसेवेबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी त्या ‘नवसंजीवनी सार्वजनिक वाचनालय’ चालवतात. लेखनासोबतच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातूनही त्या समाजाशी जोडलेल्या आहेत.
सामान्य शेतकरी कुटुंबातील असूनही सातत्यपूर्ण परिश्रम, जिद्द आणि संघर्षाच्या बळावर त्यांनी साहित्य व सामाजिक क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत इनोव्हेटिव्ह मेकर्स अकॅडमी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रा. आशा बिरारी पाटील यांनी कोणत्याही अपेक्षेशिवाय त्यांची या सन्मानासाठी विनामूल्य निवड केली आहे.
संगीता ठलाल यांच्या या निवडीमुळे कुरखेडा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews












