अबब..! गडचिरोलीत जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट मंजुरी आदेशांचा धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल

146

अबब..! गडचिरोलीत जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट मंजुरी आदेशांचा धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : जिल्हा खनिज प्रतिष्ठान (DMF), गडचिरोलीच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून त्यांचा प्रसार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
या गंभीर प्रकाराची दखल घेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा खनिज प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी पोलीस अधीक्षकांना थेट पत्र पाठवून सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्हा खनिकर्म अधिकारी इम्रान शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींनी जिल्हाधिकाऱ्यांची स्वाक्षरी तसेच जिल्हा खनिज प्रतिष्ठानचे अधिकृत लेटरहेड यांचा गैरवापर करून बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार केले. या आदेशांमध्ये विविध विकासकामांना मंजुरी व निधी वितरण झाल्याचे दर्शविण्यात आले असून ते काही व्यक्ती व कार्यालयांकडे पाठविण्यात आले होते.
हा प्रकार निदर्शनास येताच जिल्हा प्रशासनाने तात्काळ हालचाल करत चौकशी सुरू केली. प्राथमिक तपासात असे कोणतेही आदेश अधिकृतपणे जारी करण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी २३ जून २०२६ रोजी गडचिरोली पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल (FIR) दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेतील फसवणूक, बनावट कागदपत्रांची निर्मिती, शासकीय अभिलेखांचा गैरवापर तसेच आर्थिक लाभ मिळविण्याच्या प्रयत्नांशी संबंधित विविध कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने दोन बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करण्यात आले होते. या आदेशांद्वारे विकासकामांना निधी मंजूर झाल्याचे भासवून संबंधित यंत्रणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दरम्यान, डीएमएफ निधी मंजुरी व वितरणाची अधिकृत कार्यपद्धती पूर्णपणे सुरक्षित असून सर्व प्रशासकीय मान्यता व निधी वितरण प्रक्रिया केवळ अधिकृत यंत्रणांमार्फतच केली जाते, असे जिल्हा खनिकर्म अधिकारी इम्रान शेख यांनी स्पष्ट केले आहे.
कोणतेही संशयास्पद आदेश, पत्रव्यवहार किंवा कागदपत्रे आढळल्यास त्याची तात्काळ माहिती जिल्हा खनिज प्रतिष्ठान किंवा पोलीस प्रशासनाला द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here