पुराड्यात रेती माफियांना कुणाचे संरक्षण? निवडक कारवायांमुळे खळबळ
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. २४ : कुरखेडा तालुक्यातील पुराडा परिसरात अवैध रेती तस्करीच्या प्रकरणांनी पुन्हा एकदा गंभीर वळण घेतले असून, महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. नव्याने रेती तस्करी करणाऱ्यांवर तातडीने कारवाई केली जात असताना, सराईत आणि जुन्या तस्करांना मात्र अप्रत्यक्ष संरक्षण मिळत असल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, पुराडा क्षेत्रात महसूल विभागाचे दोन कर्मचारी अलीकडील काळात विशेष सक्रिय झाले असून, नव्या तस्करांवर कठोर कारवाईचा बडगा उगारत आहेत. या कारवायांमुळे प्रशासनाची कार्यवाही प्रभावी असल्याचे चित्र निर्माण होत असले तरी, प्रत्यक्षात ही कारवाई निवडक स्वरूपाची असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
नवीन तस्करांना लक्ष्य करून स्वतःची कर्तव्यदक्ष प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा सुरू असतानाच, जुन्या आणि प्रभावशाली रेती तस्करांवर मात्र कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
परिसरात सुरू असलेल्या चर्चेनुसार, काही कर्मचारी केवळ दिखाव्यासाठी नव्या तस्करांवर कारवाई करत असून, पडद्यामागे जुन्या तस्करांना संरक्षण दिले जात असल्याचा संशय बळावत आहे. या कथित दुहेरी भूमिकेमुळे संपूर्ण कारवाई प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण झाले आहेत.
अवैध रेती उपशामुळे शासनाच्या महसुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून नदीपात्रांचे पर्यावरणीय संतुलनही धोक्यात आले आहे. तरीही कारवाईत असलेली निवडकता ही गंभीर बाब मानली जात आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणात कोणत्या पातळीवर संगनमत किंवा संरक्षण दिले जात आहे, याचा सखोल तपास होणे आवश्यक असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे.
या प्रकरणाकडे आता वरिष्ठ प्रशासन कोणत्या पद्धतीने लक्ष देते आणि पुढील कारवाई काय होते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews













