सावली : शेतात झाडाला गळफास, ३० वर्षीय विवाहित तरुणाची आत्महत्या
– परिसरात शोककळा
The गडविश्व
सावली, दि. १६ : तालुक्यातील गेवरा खुर्द येथे एका ३० वर्षीय विवाहित तरुणाने शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. गुरुदास बाबुराव भोयर (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुदास भोयर हा मंगळवारी दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडला. बराच वेळ उलटूनही तो परत न आल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. नातेवाईकांनी गावासह आसपासच्या परिसरात शोधाशोध सुरू केली. अखेर शेत शिवारात शोध घेत असताना, गावातील विलास नरुले यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. हे दृश्य पाहून नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.
गुरुदासने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, यापूर्वीही त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, अशी माहिती समोर आली असून, त्यावेळी त्याला वाचवण्यात यश आले होते.
घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितेश डोर्लीकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून, या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. आत्महत्येमागील कारणांचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, एका तरुण विवाहित व्यक्तीने अशा प्रकारे जीवन संपवल्याने भोयर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गेवरा खुर्द परिसरात शोककळा पसरली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews














