प्रेमाला तंटामुक्तीची साथ : गेवर्ध्यात समितीच्या पुढाकारातून प्रेमीयुगल विवाहबद्ध

22

प्रेमाला तंटामुक्तीची साथ : गेवर्ध्यात समितीच्या पुढाकारातून प्रेमीयुगल विवाहबद्ध
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १६ : सामाजिक सलोखा जपत वाद मिटविण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती गेवर्धा यांच्या पुढाकारातून एका प्रेमीयुगलाचा विवाह सोहळा अत्यंत साध्या आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. या उपक्रमामुळे गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून तंटामुक्तीच्या कार्याला नवे अधोरेखित मिळाले आहे.
जयंत वासुदेव खुणे (मु.पो. देऊळगाव, ता. कुरखेडा) आणि पौर्णिमा बाजू उसेंडी (मु. काकडयेली, पो. दूधमाळा, ता. धानोरा) यांची ओळख पार्सल कामाच्या निमित्ताने झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कुटुंबीय व सामाजिक स्तरावरील अडचणी टाळण्यासाठी त्यांनी तंटामुक्त समिती गेवर्धा यांच्याकडे धाव घेतली.
समितीने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून योग्य समुपदेशन करत विवाह लावून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवार, १६ एप्रिल २०२५ रोजी ग्रामपंचायत गेवर्धा येथील सांस्कृतिक सभागृहात उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने विवाह सोहळा पार पडला.
या प्रसंगी प्रशासक सुषमा मडावी, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजू बारई, माजी ग्रामपंचायत सदस्य रोशन सय्यद, हेमंत शिडाम, ग्रामकोष समिती अध्यक्ष राजेंद्र कुमरे, ग्रामसभा सचिव सुधीर बाळबुद्धे यांच्यासह योगेश नखाते, मयूर चन्ने, चरणदास मडावी, भुवनेश्वर कांबळे, विनायक कुथे, सुनील किन्नाके, भोला पठाण, ग्रामपंचायत अधिकारी देवानंद भोयर, लाईनमेन अनिल बगमारे, राजन खुणे, खुशाल दखणे, संदीप कुमरे, तसेच कर्मचारी कृष्णा मस्के, दिनेश कावळे, मुकेश बोरकर, अमिता नाहामुर्ते, विनोद गावळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विवाह सोहळ्यामुळे तंटामुक्त समितीच्या सामाजिक कार्याची प्रचिती पुन्हा एकदा आली असून युवक-युवतींना योग्य मार्गदर्शन व आधार मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here