जमीन अधिग्रहणाविरोधात हजारो शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलबंडी मोर्चा
– मागण्या मान्य होईपर्यंत ठिय्या आंदोलनाचा निर्धार
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०४ : जिल्ह्यातील प्रस्तावित विमानतळ, एमआयडीसी आणि अन्य विकास प्रकल्पांसाठी करण्यात येणाऱ्या जमीन अधिग्रहणाच्या विरोधात हजारो शेतकऱ्यांनी बुधवारी बैलबंड्या, कुटुंबीय आणि संपूर्ण शिधासामग्रीसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. “शेतजमीन वाचवा, शेतकरी वाचवा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला असून, मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
गडचिरोली तालुक्यातील हिरापूर, गुरुवळा, राखी आणि शिरपूरचक येथे प्रस्तावित विमानतळासाठी जमीन अधिग्रहणास स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. त्याचप्रमाणे चामोर्शी तालुक्यातील प्रस्तावित एमआयडीसीसाठी भेंडाळा परिसरातील १४ गावांनी शेतजमिनी देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. याशिवाय जयरामपूर परिसरातील आणखी १३ गावांमधील जमीन अधिग्रहणाबाबत शासनाने आदेश जारी केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या निर्णयांच्या निषेधार्थ शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने यापूर्वी जीआरची होळी, मुंडन आंदोलन, धरणे आंदोलन तसेच विविध निवेदने देऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
यावेळी शेतकऱ्यांनी रानटी हत्तींच्या वाढत्या उपद्रवाचाही मुद्दा लावून धरला. गेल्या तीन ते चार वर्षांपासून जिल्ह्यात हत्तींच्या हल्ल्यांमुळे शेती, घरे आणि जनजीवनाचे मोठे नुकसान होत असून, कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली. प्रशासनाने याबाबत अद्याप ठोस पावले उचलली नसल्याची खंतही आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
४ जूनपासून सुरू झालेल्या या ठिय्या आंदोलनात शेतकरी नेते महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी कुटुंबीयांसह बैलबंड्या, अन्नधान्य आणि पाण्याचा साठा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून बसले आहेत. “सुपीक शेतजमिनींचे अधिग्रहण रद्द करा, पर्यायी जागांचा वापर करा आणि हत्तींच्या उपद्रवावर कायमस्वरूपी उपाय करा,” अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
या आंदोलनाला काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पक्ष, विविध समाज संघटना, डॉक्टर असोसिएशन तसेच तेली, कुणबी, कलार आणि मुस्लिम समाजासह अनेक सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे.
आंदोलनात आमदार रामदास मसराम, शेतकरी नेते महेंद्र ब्राह्मणवाडे, डॉ. अनंता कुंभारे, दिवाकर निसार, अनिल कोठारे, सुनील कोहपरे, सुभाष कोठारे, रमेश मडावी, रामदास कुकुडकर यांच्यासह विविध गावांतील शेतकरी, महिला, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे, आरपीआय नेते रोहिदास राऊत, शिवसेना नेते सुनील केदारी, वासुदेव शेडमाके, पवन गेडाम, कम्युनिस्ट पक्षाचे अमोल मारकवार यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
“जमीन वाचली तरच शेतकरी वाचेल; अन्यथा संघर्ष अधिक तीव्र करू,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला. आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दिवसभर चांगलीच खळबळ उडाली होती.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














