चौकशीत अडथळा, वरिष्ठांच्या आदेशालाही केराची टोपली; ग्रामसेवकाला ‘कारणे दाखवा’ नोटीस

8

चौकशीत अडथळा, वरिष्ठांच्या आदेशालाही केराची टोपली; ग्रामसेवकाला ‘कारणे दाखवा’ नोटीस
– जन निवेदन तक्रार चौकशीत सहकार्य न केल्याने धानोरा बीडीओंची कठोर कारवाई
The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि. ०४ : जन निवेदन पोर्टलवर प्राप्त झालेल्या तक्रारीच्या चौकशीत सहकार्य करण्यास टाळाटाळ करणे, आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून न देणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांकडे दुर्लक्ष करणे हे कामनगड ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला चांगलेच महागात पडले आहे. कर्तव्यात कसूर व शासकीय चौकशी प्रक्रियेत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी धानोरा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी (बीडीओ) यांनी संबंधित ग्रामसेवकाला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे पंचायत राज विभागात चर्चेला उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जन निवेदन पोर्टलवर दाखल झालेल्या एका तक्रारीची चौकशी करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार धानोरा पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी विस्तार अधिकारी (पंचायत) यांना कामनगड ग्रामपंचायतीतील अभिलेखे व आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले.
चौकशीदरम्यान ८ मे २०२६ रोजी विस्तार अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला भेट देऊन आवश्यक नोंदवह्या, खर्च विवरणपत्रे व संबंधित कागदपत्रांची मागणी केली होती. मात्र, चौकशीसाठी आवश्यक अभिलेखे उपलब्ध करून देण्यात आली नाहीत. त्यानंतर १४ मे रोजी पुन्हा चौकशीसाठी भेट दिली असता संबंधित ग्रामसेवक कोणतीही पूर्वसूचना न देता कार्यालयातून अनुपस्थित असल्याचे आढळून आले.
या प्रकारामुळे शासकीय चौकशी प्रक्रियेला विलंब झाला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांची अवहेलना झाल्याचा ठपका संबंधित ग्रामसेवकावर ठेवण्यात आला आहे. तसेच ही बाब कार्यालयीन शिस्तभंगाची असून ‘महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम, १९६७’ मधील नियम ३ चे उल्लंघन करणारी असल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
या गंभीर प्रकाराची दखल घेत प्रशासनाने ‘महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम, १९६४’ अंतर्गत कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत तीन दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मुदतीत समाधानकारक उत्तर न दिल्यास संबंधित ग्रामसेवकाविरुद्ध थेट प्रशासकीय व शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here