प्रोजेक्ट ‘उडान’ला भरारी ; गडचिरोलीत रोजगार मेळाव्यातून 1278 युवकांना थेट रोजगार

14

प्रोजेक्ट ‘उडान’ला भरारी ; गडचिरोलीत रोजगार मेळाव्यातून 1278 युवकांना थेट रोजगार
– अतिदुर्गम भागातील तरुणांसाठी पोलीस दलाचा पुढाकार, 31 नव्या वाहनांचे लोकार्पण
The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : गडचिरोली पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत आयोजित भव्य रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत 1278 युवक-युवतींना विविध नामांकित कंपन्यांत थेट रोजगाराची संधी मिळाली. दुर्गम व अतिदुर्गम भागातील सुशिक्षित तरुणांना मुख्य प्रवाहात आणणारा हा उपक्रम ठरला आहे.
पोलीस मुख्यालयातील शहीद पांडू आलाम सभागृहात पार पडलेल्या या मेळाव्याचे उद्घाटन राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी निवड झालेल्या युवक-युवतींना नियुक्तीपत्रे प्रदान करून त्यांचा सत्कार केला. “मिळालेल्या संधीचा प्रामाणिकपणे उपयोग करून उज्ज्वल भविष्य घडवा,” असे आवाहन त्यांनी केले.
या रोजगार मेळाव्यात महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, फ्लिपकार्ट, डी-मार्ट, लॉयड्स मेटल्स यांसह एकूण 38 कंपन्यांनी सहभाग नोंदविला. सुमारे 4000 पेक्षा अधिक युवक-युवतींनी नोंदणी केली होती, तर 2400 उमेदवार प्रत्यक्ष सहभागी झाले. निवड प्रक्रियेनंतर विविध कंपन्यांमध्ये एकूण 1278 उमेदवारांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या उमेदवारांना 1.80 लाख ते 3.60 लाख रुपये वार्षिक पॅकेज देण्यात आले.

गडचिरोली जिल्ह्यात माओवाद आटोक्यात येत असताना पोलीस दलाने विकासाभिमुख उपक्रमांना चालना दिली आहे. ‘पोलीस दादालोरा खिडकी’च्या माध्यमातून आतापर्यंत सुरक्षा रक्षक, नर्सिंग, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिशियन, वेल्डिंग, सॉफ्टवेअर आदी क्षेत्रांत हजारो युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.

माओवादीविरोधी अभियानासाठी 31 वाहनांचे लोकार्पण

कार्यक्रमादरम्यान माओवादीविरोधी पेट्रोलिंगसाठी 31 चारचाकी वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये 3 अत्याधुनिक सर्व्हेलियन्स व्हॅनचा समावेश असून, यामुळे दुर्गम भागातील मोहिमा अधिक सक्षम होणार आहेत.
या कार्यक्रमास आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, जि.प. सीईओ सुहास गाडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या रोजगार मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरी कृती शाखेने विशेष परिश्रम घेतले.
‘प्रोजेक्ट उडान’मुळे गडचिरोलीतील युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत असून, जिल्ह्याच्या विकासाला नवी गती मिळत असल्याचे चित्र या मेळाव्यातून स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here