देसाईगंजमध्ये खत घोटाळा उघड ; नाकाडे कृषी केंद्र संचालकावर गुन्हा दाखल

2

देसाईगंजमध्ये खत घोटाळा उघड ; नाकाडे कृषी केंद्र संचालकावर गुन्हा दाखल
– अनुदानित डीएपीचा काळाबाजार, ई-पॉस प्रणालीत फेरफार : २५ मेट्रिक टन खत जिल्ह्याबाहेर विक्रीचा प्रकार समोर
The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : देसाईगंज येथे अनुदानित खताच्या विक्रीत मोठा घोटाळा उघडकीस आला असून, शेतकऱ्यांच्या नावावर बोगस विक्री दाखवत खताचा काळाबाजार केल्याप्रकरणी मे. नाकाडे कृषी केंद्राचे संचालक भास्कर महादेव नाकाडे यांच्याविरुद्ध देसाईगंज पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी दिली.
कृषी विभागाच्या जिल्हा भरारी पथकाने तसेच तालुका गुणनियंत्रण निरीक्षकांनी ८ ते १२ एप्रिल २०२६ दरम्यान संबंधित कृषी केंद्राची संयुक्त तपासणी केली. या तपासणीत गंभीर अनियमितता समोर आली. ई-पॉस मशीनवर शेतकऱ्यांच्या नावावर सुमारे १.५ मेट्रिक टन डीएपी खत विक्री दाखविण्यात आली होती; मात्र प्रत्यक्षात संबंधित शेतकऱ्यांनी इतक्या प्रमाणात खत खरेदी केले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे बोगस व्यवहाराचा पर्दाफाश झाला.
याशिवाय आयएफएमएस (iFMS) पोर्टलवरील नोंदींची पडताळणी करताना सुमारे २५ मेट्रिक टन अनुदानित खत जिल्ह्याबाहेर विकल्याचे निदर्शनास आले. दुकानातील साठा नोंदवही अद्ययावत नसणे, प्रत्यक्ष साठा आणि नोंदींमध्ये मोठी तफावत आढळणे तसेच शेतकऱ्यांना पक्की बिले न देणे असे प्रकारही तपासात समोर आले.
या अनियमिततेबाबत कृषी विभागाने ९ एप्रिल रोजी संबंधित संचालकास कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र त्यांचा खुलासा असमाधानकारक ठरल्याने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या खत निरीक्षक श्रीमती शितल खोबरागडे यांनी देसाईगंज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ तसेच खत (नियंत्रण) आदेश, १९८५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, या कारवाईनंतर कृषी विभागाने जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांना कडक इशारा दिला असून, खत विक्रीत पारदर्शकता न राखल्यास किंवा ई-पॉस प्रणालीत कोणतीही छेडछाड केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

#thegdv #thegadvishva #FertilizerScam #Desaiganj #FarmerRights #AgricultureCorruption #DAPScam #BlackMarketing #EPOSFraud #RuralNews #Gadchiroli #AgriScam #FarmerJustice #CorruptionExposed #BreakingNews #IndiaNews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here