गडचिरोली : RTE प्रवेशावर संशयाचे सावट, खोटी माहिती देऊन प्रवेश?

23

गडचिरोली : RTE प्रवेशावर संशयाचे सावट, ‘खोटी माहिती देऊन प्रवेश?
– सखोल चौकशीची रुपेश वलके यांची मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. १५ : शिक्षणाचा हक्क कायदा (RTE) अंतर्गत होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेवर आता संशयाचे सावट निर्माण झाले आहे. काही विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये चुकीची माहिती देत प्रवेश मिळवल्याची शक्यता व्यक्त होत असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची जोरदार मागणी पुढे आली आहे.
गडचिरोली येथील सामाजिक युवा कार्यकर्ते रुपेश वलके यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्याकडे निवेदन सादर करत या प्रक्रियेतील अनियमिततेकडे लक्ष वेधले आहे. दरवर्षी RTE अंतर्गत हजारो विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो मात्र यंदा काही अर्जांमध्ये दिलेल्या रहिवासी पत्त्याबाबत तसेच शाळेपासूनच्या अंतराबाबत (Distance) गंभीर शंका उपस्थित होत आहेत.
“खोटी माहिती देऊन काही अपात्र विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत असेल, तर खऱ्या गरजू विद्यार्थ्यांवर अन्याय होतो,” अशी भावना या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदनात प्रशासनाला काही महत्त्वाच्या बाबींची काटेकोर चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. अर्जातील पत्ता प्रत्यक्षात योग्य आहे का, शाळेपासूनचे अंतर खरे आहे का याची पंचनाम्याद्वारे तपासणी, संबंधित कुटुंब त्या परिसरात वास्तव्यास आहे का याची खात्री, तसेच आधार कार्ड व उत्पन्न प्रमाणपत्राची पडताळणी अनिवार्य करण्यावर भर देण्यात आला आहे. यासोबतच स्थानिक पोलीस पाटील यांचा रहिवासी दाखलाही सक्तीचा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबविली गेल्यासच RTE योजनेचा लाभ खऱ्या अर्थाने गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, प्रशासनाने या गंभीर मुद्द्याकडे तातडीने लक्ष देऊन १५ दिवसांच्या आत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. या निवेदनामुळे RTE प्रवेश प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, आता शिक्षण विभाग काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here