गेवर्धा ग्रामपंचायतीच्या कामांचा आदर्श ठसा : सीईओ सुहास गाडे यांचे कौतुक
– पोलीस दलात निवड झालेल्या युवकांचा सत्कार
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १५ : ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अंतर्गत गेवर्धा ग्रामपंचायतीत राबविण्यात येणाऱ्या विकासकामांचा दर्जा आणि नियोजन पाहून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी समाधान व्यक्त करत ग्रामपंचायतीचे विशेष कौतुक केले. त्यांच्या या दौऱ्यामुळे गावातील विकासकामांना नवे बळ मिळाले आहे.
सीईओ गाडे यांनी आपल्या भेटीदरम्यान ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी तसेच जिल्हा परिषद शाळेला भेट देत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची सखोल पाहणी केली. ‘समृद्ध पंचायत राज अभियान’ अंतर्गत गावात राबविण्यात येणाऱ्या योजनांची अंमलबजावणी समाधानकारक असून, ग्रामपंचायतीने केलेले नियोजन आदर्शवत असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, गडचिरोली पोलीस दलात निवड होऊन गावाचा नावलौकिक वाढविणाऱ्या प्रवीण पैकुजी कुळसंगे व सुमेध खुशाल रामटेके या युवकांचा सीईओ गाडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या सन्मानामुळे गावातील तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, हा सत्कार प्रेरणादायी ठरला.
या पाहणी दौऱ्यावेळी गटविकास अधिकारी धिरज पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी उराडे, विस्तार अधिकारी भोगे व कुळसंगे, तसेच उपविभागीय अभियंता मडावी, शाखा अभियंता भोयर व नाकाडे मॅडम उपस्थित होते.
ग्रामपंचायत अधिकारी देवानंद भोयर व सदस्य रोशन सय्यद यांनी गावातील विकासकामांची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांना दिली.
कार्यक्रमाला पोलीस पाटील भाग्यरेखा वझाडे, तंटामुक्ती अध्यक्ष राजू बारई, ग्रामकोष समिती अध्यक्ष राजेंद्र कुमरे, ग्रामसभा अध्यक्ष सुरेश पुसाम, सचिव सुधीर बाळबुद्धे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews














