निमगाव (रांगी) येथे महसूल विभागाची धडक कारवाई ; अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त

1

निमगाव (रांगी) येथे महसूल विभागाची धडक कारवाई ; अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त
The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि. १९ : तालुक्यातील निमगाव (रांगी) परिसरात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरुद्ध महसूल विभागाने धडक कारवाई करत रेतीने भरलेले ट्रॅक्टर जप्त केले. १८ एप्रिलच्या रात्री सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, निमगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उत्खनन व वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. याची गंभीर दखल घेत महसूल विभागाच्या पथकाने १८ एप्रिलच्या रात्री परिसरात गस्त घालत सापळा रचला. दरम्यान, संशयास्पदरीत्या येणारे रेतीने भरलेले ट्रॅक्टर अडवून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान संबंधित ट्रॅक्टरकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे उघडकीस आले.
जप्त करण्यात आलेले ट्रॅक्टर (क्र. एम.एच. ३४ एल ३२१९) हे गिरिधर केशव मेश्राम यांच्या मालकीचे असल्याचे समोर आले आहे. सदर वाहन महसूल विभागाने ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात जमा केले असून, संबंधित मालकावर शासकीय नियमांनुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ही कारवाई तहसीलदार गणेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये नायब तहसीलदार देवेंद्र वाळके, अल्पेश बारापात्रे, मंडळ अधिकारी सुभाष रासेकर, महसूल सहाय्यक हितेश लांजेवार तसेच ग्राम महसूल अधिकारी दिनेश पदा यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
दरम्यान, “अवैध रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाई सुरूच राहील,” असा स्पष्ट इशारा महसूल प्रशासनाने दिला आहे. या कारवाईमुळे निमगाव (रांगी) व परिसरातील अवैध रेती चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, प्रशासनाचा धाक निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here