आरमोरी हादरले! २९ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
– कारण अद्याप अस्पष्ट
The गडविश्व
ता. प्र/ आरमोरी, दि. १९ : शहरातील तहसील कार्यालयाजवळील आदिवासी मुलींच्या वस्तीगृहासमोरील परिसरात रविवारी सायंकाळी घडलेल्या आत्महत्येच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. २९ वर्षीय मयूर तुकाराम सोनकुसरे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याची घटना सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मयूर यांनी घरातच दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. काही वेळाने ही बाब लक्षात येताच नातेवाईक व शेजाऱ्यांनी तातडीने धाव घेतली. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. घटनेची माहिती मिळताच आरमोरी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.
मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला असून, प्राथमिक तपासात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
मयूर सोनकुसरे यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती साधारण असून, रोजंदारीवर त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. मयूर स्वभावाने शांत, मनमिळावू आणि सर्वांशी मिळून मिसळून वागणारा होता, अशी माहिती स्थानिकांनी दिली. त्यामुळे त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप कोणतेही स्पष्ट कारण समोर आलेले नाही.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, सोनकुसरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews














