ग्रामपंचायतींवर लाल बावटा फडकविण्यासाठी सज्ज व्हा
– शेकाप नेते भाई रामदास जराते यांचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. १८ : ‘ग्रामपंचायती’ या गावाच्या सर्वांगीण विकासाचे प्रभावी माध्यम असल्याने आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतींवर स्वतंत्र पॅनलच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा फडकविण्याच्या उद्देशाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संघटनात्मक बळकटीसाठी कामाला लागावे, असे आवाहन शेकापचे नेते भाई रामदास जराते यांनी केले.
शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात गडचिरोली तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची संघटन बांधणी आढावा बैठक पार पडली. या बैठकीत विविध स्थानिक व शेतकरी हिताच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
तालुक्यात कॉर्पोरेट कंपन्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या एमआयडीसीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दरात जाण्याची शक्यता असल्याने नव्या एमआयडीसी क्षेत्राला ग्रामपंचायत व ग्रामसभांच्या माध्यमातून ठराव करून विरोध नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले. तसेच शेतजमिनींच्या भूसंपादनाला कारणीभूत ठरणाऱ्या लोह खाणींविरोधातील आंदोलनात मोठ्या प्रमाणावर जनसहभाग वाढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
याशिवाय विधवा, निराधार व वृद्धांसाठीच्या पेन्शन योजनेत वाढ करणे, अवाजवी वीजबिल लादणारे स्मार्ट मीटर रद्द करणे, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि नवीन पीककर्जाची तात्काळ अंमलबजावणी करणे, तसेच वेळेत व पुरेशा प्रमाणात बियाणे व रासायनिक खते उपलब्ध करून देणे या प्रमुख मागण्यांवर कार्यकर्त्यांनी अधिकाधिक युवकांना पक्षाशी जोडण्याचे काम करावे, असेही बैठकीत ठरविण्यात आले.
या बैठकीस पक्षाच्या महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, अशोक किरंगे, चंद्रकांत भोयर, महागू पिपरे, उमाजी मुनघाटे, किसन साखरे, दादाजी कांबळे, राकेश भोयर, आशिष मेश्राम, शालिकराम भोयर, रुमाजी मेश्राम, दीपक मानकर, राजू जराते, प्रदीप मेश्राम, ताराचंद जेंगठे, आनंदराव मेश्राम, डोनूजी साखरे, रामदास दाणे आदी उपस्थित होते.














