रांगी ग्रामपंचायतीची प्रभाग रचना जाहीर ; निवडणुकीची हालचाल वेगात

9

रांगी ग्रामपंचायतीची प्रभाग रचना जाहीर ; निवडणुकीची हालचाल वेगात
The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. १८ : धानोरा तालुक्यातील रांगी ग्रामपंचायतीचा कार्यकाळ नुकताच संपल्याने ग्रामपंचायत बरखास्त करण्यात आली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने प्रभाग रचना जाहीर केली आहे. ही प्रभाग रचना ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली असून मतदारांना अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. परिशिष्ट ६ व नमुना ‘ब’नुसार ग्रामपंचायतीचे एकूण तीन प्रभाग निश्चित करण्यात आले असून २०११ च्या जनगणनेच्या आधारे प्रभागनिहाय मतदारसंख्या व आरक्षणाचा तपशील स्पष्ट करण्यात आला आहे.
जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक १ मध्ये घर क्रमांक १ ते २२० या क्षेत्राचा समावेश असून अनुसूचित जातीचे ४३ व अनुसूचित जमातीचे २७१ असे एकूण ७३५ मतदार आहेत आणि येथून ३ सदस्य निवडले जाणार आहेत. प्रभाग क्रमांक २ मध्ये घर क्रमांक २२१ ते ४३५ या क्षेत्राचा समावेश असून अनुसूचित जातीचे १४० व अनुसूचित जमातीचे २३५ असे एकूण ७३५ मतदार आहेत, येथूनही ३ सदस्य निवडले जाणार आहेत. तर प्रभाग क्रमांक ३ मध्ये घर क्रमांक ४३६ ते ६४३ या क्षेत्राचा समावेश असून अनुसूचित जातीचे ८ व अनुसूचित जमातीचे ३१९ असे एकूण ७३६ मतदार आहेत आणि या प्रभागातूनही ३ सदस्य निवडले जाणार आहेत.
एकूण गावातील मतदारसंख्या २२०६ इतकी असून त्यामध्ये अनुसूचित जातीचे १९१, अनुसूचित जमातीचे ८२५ आणि इतर प्रवर्गातील ११९० मतदारांचा समावेश आहे. ग्रामपंचायतीची एकूण सदस्यसंख्या ९ निश्चित करण्यात आली आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्याने आता गावातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता असून आगामी ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here