“गाण्यावर बंदी नाही… मग नृत्यावर गुन्हा का?” पुण्यात गडचिरोलीतील विद्यार्थ्यांवर कारवाई

107

“गाण्यावर बंदी नाही… मग नृत्यावर गुन्हा का?” पुण्यात गडचिरोलीतील विद्यार्थ्यांवर कारवाई
– विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याची आजाद समाज पक्षाची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा
The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : पुण्यातील विश्रांतवाडी येथील समाजकल्याण वस्तीगृहात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात आदिवासी संस्कृतीचे सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केल्याच्या घटनेने वादंग निर्माण झाला आहे. “हिडमा” या गाण्यावर नृत्य सादर केल्यामुळे दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने आजाद समाज पक्षाने तीव्र निषेध व्यक्त करत ही कारवाई अन्यायकारक व दडपशाहीची असल्याचा आरोप केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असलेले किरण गोमासे व श्रीनिवास कुमरी हे दोघे विद्यार्थी सध्या पुण्यातील समाजकल्याण वसतिगृहात शिक्षण घेत असून त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात “हिडमा” गाण्यावर नृत्य सादर केले होते. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
आजाद समाज पक्षाच्या वतीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, संबंधित विद्यार्थी निष्पाप असून त्यांचा कोणत्याही नक्षलवादी विचारसरणीशी संबंध नाही. केवळ आदिवासी संस्कृतीचे सादरीकरण केल्याबद्दल त्यांना गुन्हेगार ठरवणे हे संविधानिक मूल्यांवर आघात करणारे आहे.
पक्षाने उपस्थित केलेल्या प्रश्नानुसार, “जर ‘हिडमा’ गाण्यावर कोणतीही अधिकृत बंदी नाही आणि ते यूट्यूबवर सहज उपलब्ध आहे, तर त्या गाण्यावर नृत्य केल्याबद्दल विद्यार्थ्यांवर कारवाई कशी होऊ शकते?” शासनाने गाण्यावर किंवा त्याच्या निर्मात्यांवर कोणतीही कारवाई न करता विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करणे हा कायद्याचा चुकीचा व विसंगत वापर असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
ही कारवाई विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व मानसिक आयुष्यावर गंभीर परिणाम करणारी असून त्यांच्या भवितव्याशी खेळ करणारी असल्याची टीकाही पक्षाने केली आहे.
दरम्यान, आजाद समाज पक्षाने प्रशासनाला इशारा देत या प्रकरणाची तात्काळ व निष्पक्ष चौकशी करून संबंधित विद्यार्थ्यांवरील गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, अशी ठाम मागणी केली आहे. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
“न्याय, समता आणि संविधानिक अधिकारांचे संरक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांवर अन्याय सहन केला जाणार नाही,” असे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी स्पष्ट केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #Pune #Gadchiroli #StudentIssue #AzadSamajParty #TribalCulture #FreedomOfExpression #JusticeForStudents #AmbedkarJayanti #MahatmaPhule #BreakingNews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here