‘पगार द्या, काम घ्या’ ; कुरखेडा नगरपंचायतीत सफाई कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन

36

‘पगार द्या, काम घ्या’ कुरखेडा नगरपंचायतीत सफाई कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन
– स्वच्छता व्यवस्था ठप्प
The गडविश्व
ता. प्र/कुरखेडा, दि. २३ : मागील दोन महिन्यांचा (फेब्रुवारी व मार्च २०२६) थकीत पगार न मिळाल्याने कुरखेडा नगरपंचायतमधील सफाई कर्मचाऱ्यांनी अखेर संतप्त होत आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. सकाळपासूनच नगरपंचायत मुख्याधिकारी कार्यालयासमोर सफाई कामगार महिला बचत गटाच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली.
‘पगार द्या, काम घ्या’, ‘मेहनतीचे पैसे द्या, अन्यथा आंदोलन तीव्र करू’, ‘मुख्याधिकारी जागे व्हा’ अशा घोषणा देत कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. यापूर्वी १० एप्रिल २०२६ रोजी मुख्याधिकारी यांना निवेदन देत ७ दिवसांत पगार जमा करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, १३ दिवस उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला.
एका महिला सफाई कर्मचाऱ्याने आपल्या व्यथा मांडताना सांगितले, ‘आम्ही रोज पहाटेपासून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत करतो. मात्र, आमच्याच घरात दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. दोन महिन्यांचा पगार थकीत आहे. पैसे मिळेपर्यंत आम्ही काम बंद ठेवणार आहोत.’
सफाई कामगार महिला बचत गटाच्या अध्यक्षा यांनीही प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप करत सांगितले की, ‘वारंवार विनंती करूनही दखल घेतली गेली नाही. आता आम्ही लोकशाही मार्गाने आमच्या हक्कासाठी लढणार आहोत. शासनाने तात्काळ पगार मंजूर करावा.’
दरम्यान, या आंदोलनामुळे नगरपंचायत क्षेत्रातील स्वच्छता व्यवस्था पूर्णतः ठप्प झाली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नगरपंचायत स्वच्छता सभापती सागर निरंकारी यांनी लवकरच प्रशासनासोबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असले, तरी पगार जमा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here