गेवर्धा तंटामुक्त समितीच्या पुढाकारातून प्रेमीयुगुल विवाहबद्ध
– साध्या पद्धतीने सोहळा संपन्न
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि.२४ : सामाजिक सलोखा आणि परस्पर समन्वयाचा आदर्श घालून देणारी घटना गेवर्धा येथे घडली. महात्मा गांधी तंटामुक्त समिती गेवर्धा यांच्या पुढाकारातून प्रेमीयुगुलाचा विवाह आज शुक्रवारी ग्रामपंचायतच्या सांस्कृतिक सभागृहात उत्साहात पार पडला.
ओमप्रकाश मनोहर करसाल (रा. पलसगड, ता. कुरखेडा) आणि रागिणी संजय पुराम (रा. गरगडा, पो. चारभट्टी, ता. कुरखेडा) यांची मागील वर्षभरापासून एकमेकांच्या गावात ये-जा करताना ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.
यानंतर दोघांनी महात्मा गांधी तंटामुक्त समिती गेवर्धा यांच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन विवाह लावून देण्याची विनंती केली. समितीने सकारात्मक भूमिका घेत दोन्ही कुटुंबीयांशी समन्वय साधत विवाहासाठी पुढाकार घेतला. त्यानुसार आज ग्रामपंचायत गेवर्धा येथील सांस्कृतिक सभागृहात उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने दोघांचा विवाह सोहळा संपन्न झाला.
यावेळी प्रशासक सुषमा मडावी, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजू बारई, पोलीस पाटील भाग्यरेखा वझाडे, माजी ग्रामपंचायत सदस्य रोशन सय्यद, ग्रामसभा अध्यक्ष सुरेश पुसाम, ग्रामसभा सचिव सुधीर बाळबुद्धे तसेच योगेश नखाते, रमेश कवडो, चरणदास मडावी, भुवनेश्वर कांबळे, प्रभाकर कुळमेथे, नवनाथ गोबाडे, गुरुदेव गावळे, ग्रामपंचायत कर्मचारी कृष्णा मस्के, दिनेश कावळे, विनोद गावळे आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तंटामुक्त समितीच्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत असून सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा विवाह ठरला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews













