येंगलखेडा शंकरपट जागेवर अतिक्रमण? तहसीलदारांकडे तक्रार

26

येंगलखेडा शंकरपट जागेवर अतिक्रमण? तहसीलदारांकडे तक्रार
-सात दिवसांत कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २४ : तालुक्यातील येंगलखेडा येथील शासकीय शंकरपट सार्वजनिक जागेवर अतिक्रमण झाल्याचा गंभीर आरोप करत ग्रामस्थांनी तहसीलदार, कुरखेडा यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज सादर केला आहे. या प्रकरणी तातडीने कारवाई न झाल्यास सात दिवसांनंतर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येंगलखेडा येथील सर्वे क्रमांक २०१ मधील सुमारे ४.०५ हेक्टर शासकीय जमीन ही पशुवैद्यकीय दवाखाना, अंगणवाडी, पाण्याची टाकी, आठवडी बाजार, बीएसएनएल टॉवर, आदिवासी धान्य गोदाम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे खेळाचे मैदान तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, या जागेवर बेकायदेशीररीत्या पक्के घर उभारण्यात आले असून खासगी मोबाईल टॉवरही उभारण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तसेच, संबंधित जागेवर शेती करून मका लागवड करण्यात आली असून सिमेंटचे खांब उभारल्याने शेजारील शेतकऱ्यांचा बैलबंडी व ट्रॅक्टर मार्ग बंद झाल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामपंचायत व भूमी अभिलेख विभागाने यापूर्वी केलेल्या मोजणीत अतिक्रमण स्पष्ट झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. मात्र, अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
या तक्रार अर्जाच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, संबंधित पोलीस विभाग व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.
शासकीय जागेवरील अतिक्रमण तातडीने हटवून ती जागा सार्वजनिक सुविधांसाठी उपलब्ध करून द्यावी, अशी ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे. आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
#thegdv #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here