नक्षल्यांची केंद्रीय कमेटी आत्मसमर्पणाच्या तयारीत ; पत्र जारी करत तिन्ही राज्यांच्या सरकारकडे वेळ मागितली

88

नक्षल्यांची केंद्रीय कमेटी आत्मसमर्पणाच्या तयारीत ; पत्र जारी करत तिन्ही राज्यांच्या सरकारकडे वेळ मागितली
– सुरक्षा मोहिमा स्थगित करण्याची केली मागणी
The गडविश्व
गडचिरोली/ विशेष प्रतिनिधी, दि. २४ : नक्षलवादाच्या तीन दशकांच्या रक्तरंजित इतिहासानंतर अखेर या चळवळीत ऐतिहासिक वळण पाहायला मिळत आहे. भारताची कम्युनिस्ट पार्टी (माओवादी)च्या महाराष्ट्र–मध्यप्रदेश–छत्तीसगड (MMC) स्पेशल जोनल कमिटीने अधिकृत पत्र जारी करत आत्मसमर्पणाची तयारी दर्शवली असून, तिन्ही राज्यांच्या सरकारांकडे १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंतची मुदत देण्याची विनंती केली आहे. प्रवक्ता अनंत यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झालेल्या या पत्रामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.
पक्षाच्या केंद्रीय कमिटीचे पोलित ब्यूरो सदस्य कॉम्रेड सोनू दादा यांनी काही दिवसांपूर्वी शस्त्र संघर्षाला विराम देण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर CCM सतीश दादा आणि अलीकडेच CCM चंद्रण्णा यांनीही खुल्या शब्दांत त्याला समर्थन दिले. या घडामोडींनंतर MMC स्पेशल जोनल कमिटीनेही सामूहिकरीत्या शस्त्रत्याग करण्याची तयारी दाखवत सरकारसमोर औपचारिक प्रस्ताव ठेवला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ‘आमची संघटना जनवादी केंद्रीयतेच्या तत्त्वांवर चालते. सर्व साथीदारांपर्यंत संदेश पोहोचविण्यासाठी वेळ लागणार असून, संपर्क साधनांच्या अभावामुळे आम्हाला १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंतची मुदत आवश्यक आहे.’

सुरक्षा मोहिमा थांबवण्याची अट

कमिटीने तीनही राज्यांच्या सरकारांना स्पष्टपणे विनंती केली आहे की,

सुरक्षा दलांचे कॉम्बिंग ऑपरेशन्स, शोधमोहीम आणि इनपुट-आधारित कारवाया तात्पुरते थांबवाव्यात.

मुखबिरीचे जाळे आणि लष्करी हालचाली कमी कराव्यात.

येत्या PLGA सप्ताहातही कोणतीही कारवाई करू नये; कारण संघटना यंदा PLGA सप्ताह न साजरा करता सर्व क्रियांना विराम देणार आहे.

रेडिओवरून संदेश प्रसारित करण्याची विशेष मागणी

जंगलात काम करणाऱ्या नक्षल कार्यकर्त्यांपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी सरकारने पुढील काही दिवस हे निवेदन रेडिओवर प्रसारित करावे, अशी माओवादी कमिटीने विनंती केली आहे. ‘रेडिओ हा आमच्या साथीदारांपर्यंत पोहोचण्याचा एकमेव प्रभावी माध्यम आहे,’असे त्यात नमूद केले आहे.

मध्यस्थीसाठी पत्रकार व जनप्रतिनिधींना आवाहन

अनंत यांनी जनप्रतिनिधी, पत्रकार आणि यूट्युबर पत्रकारांना या प्रक्रियेत मध्यस्थी म्हणून पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
‘छत्तीसगड आणि महाराष्ट्रात जशी भूमिका निभावली गेली, तशीच मध्यस्थी MMC झोनमध्येही आवश्यक आहे,’ असे ते म्हणाले.

सरकारच्या प्रतिसादाची प्रतीक्षा

MMC कमिटीने स्पष्ट केले आहे की, सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताच ते लवकरच दुसरी प्रेस नोट जाहीर करतील आणि शस्त्रत्यागाची अधिकृत तारीख सार्वजनिक करतील.
या निवेदनामुळे तीनही राज्यांतील सुरक्षा समीकरणात नवे तरंग उमटले आहेत. माओवादी चळवळ निर्णायक टप्प्यावर येत असल्याचा संकेत मिळत असून, सरकार कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #MaoistSurrender #CentralCommitteeStatement #MMCZone #MaoistCeasefireOffer #SurrenderProposal #GovernmentResponseAwaited #AntiNaxalOperations #PeaceInitiative #RehabilitationScheme #NaxalLeadership #BreakingNews #IndiaSecurity #MaoistNegotiations #CeasefireRequest #RedCorridorUpdate

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here