मौशीखांब ग्रामपंचायतीला ISO मानांकन ; सुशासनाचा नवा आदर्श स्थापित
The गडविश्व
ता. प्र / धानोरा , दि. २३ : गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब ग्रामपंचायतीने प्रशासनातील पारदर्शकता, प्रभावी कामकाज आणि डिजिटल व्यवस्थापनाच्या जोरावर प्रतिष्ठेचे ISO मानांकन मिळवले असून, या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण कार्यक्षमतेचा आढावा घेऊन हे मानांकन प्रदान करण्यात आले.
ग्रामपंचायतीने सामान्य प्रशासन, आरोग्य, शिक्षण-प्रशिक्षण, पशुपालन, पाणीपुरवठा, लघु सिंचन, कामगार, वित्त–लेखा, सामाजिक कल्याण, कृषी तसेच महिला व बालकल्याण अशा विविध विभागांतील नोंदी अचूक आणि सुव्यवस्थित ठेवून उत्कृष्ट कामकाजाची छाप उमटवली आहे. नागरिकांना सेवा सुलभ व्हाव्यात यासाठी ग्रामपंचायतीने स्वतंत्र ऑनलाइन वेबसाईट तयार करून डिजिटल सुशासनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
या मानांकनासाठी सरपंच सौ. रंजिता पेंदाम, उपसरपंच सौ. रुपाली गंधरवार, ग्रामपंचायत अधिकारी खुशाल नेवारे, सदस्य विकास उंदिरवडे, जयकुमार खेडेकर, निलेश होळी, सुधाकर गेडाम, सौ. कुमरे, सौ. अर्ला, साई तिवाडे, सौ. माधुरी भुरसे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थांनी एकजुटीने केलेल्या परिश्रमांचे मोठे योगदान आहे.
मानांकनाबाबत समाधान व्यक्त करत ग्रामपंचायत अधिकारी खुशाल नेवारे यांनी सर्व सदस्य, कर्मचारी आणि ग्रामस्थांचे आभार मानले. मौशीखांब ग्रामपंचायतीने मिळवलेले ISO मानांकन गडचिरोली जिल्ह्यासाठी एक प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














