सर्च ऑपरेशनदरम्यान भीषण IED स्फोट ; 4 जवान शहीद

114

सर्च ऑपरेशनदरम्यान भीषण IED स्फोट ; 4 जवान शहीद
The गडविश्व
कांकेर/नारायणपूर, दि. ०२ : छत्तीसगडमधील कांकेर-नारायणपूर सीमावर्ती जंगल परिसरात शनिवारी सकाळी नक्षलवाद्यांनी लावलेल्या आयईडी स्फोटात चार जवान शहीद झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सर्च ऑपरेशनदरम्यान झालेल्या या भीषण स्फोटामुळे सुरक्षा दलाला मोठा धक्का बसला असून परिसरात सतर्कता वाढविण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छोटेबेठिया पोलीस ठाणे हद्दीतील कोरोसकोडा जंगल परिसरात सुरक्षा दलाचे पथक शनिवारी सकाळी नक्षलविरोधी सर्च मोहिमेसाठी रवाना झाले होते. जंगल भागात नक्षलवाद्यांनी पूर्वीच पेरून ठेवलेली आयईडी शोधून ती निकामी करण्याची कारवाई सुरू असतानाच अचानक जोरदार स्फोट झाला. स्फोट इतका तीव्र होता की जवानांना सावरण्याची संधीही मिळाली नाही.
या घटनेत तीन जवानांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या जवान परमानंद कोर्राम यांना तातडीने रायपूर येथे उपचारासाठी एअरलिफ्ट करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचीही प्राणज्योत मालवली. त्यामुळे शहीद जवानांची संख्या चारवर पोहोचली.
घटनेनंतर सुरक्षा दलाने संपूर्ण परिसर सील करून मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. बस्तर रेंजचे आयजी सुंदरराज पी. यांनी घटनेला दुजोरा दिला असून, मोहिमेदरम्यान नक्षलवाद्यांचा स्फोटकांचा डंपही जप्त करण्यात आल्याची माहिती दिली.
तसेच सरेंडर केलेल्या माजी नक्षलवाद्यांकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून जंगल भागातील आयईडी शोधून निकामी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शनिवारीचे ऑपरेशनही त्याच मोहिमेचा भाग होते. मात्र या स्फोटामुळे सुरक्षा यंत्रणेला मोठा धक्का बसला असल्याचेही त्यांनी सांगितले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here