महाराष्ट्र दिनी गडचिरोली पोलीस दलाचा गौरव सोहळा : 570 अधिकारी-अंमलदारांचा सन्मान

90

महाराष्ट्र दिनी गडचिरोली पोलीस दलाचा गौरव सोहळा : 570 अधिकारी-अंमलदारांचा सन्मान
The गडविश्व
गडचिरोली, दि.०२: महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण व गौरव समारंभ पार पडला. पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलीस दलातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 145 अधिकारी व अंमलदारांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह, तर 425 अधिकारी व अंमलदारांना प्रथमच जाहीर करण्यात आलेले सी-60 सेवा पदक घोषित करण्यात आले. यापैकी निवडक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समारंभात प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्यात माओवादविरोधी लढ्यात सी-60 पथकाने बजावलेल्या शौर्यपूर्ण कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र शासनाने सन 2026 मध्ये प्रथमच सी-60 सेवा पदकास मान्यता दिली आहे. या पदकांपैकी तब्बल 425 पदके गडचिरोली जिल्ह्यातील अधिकारी व अंमलदारांना, तर उर्वरित 75 पदके गोंदिया जिल्ह्यास देण्यात आली आहेत.
1990 मध्ये 60 जवानांच्या पथकातून स्थापन झालेल्या सी-60 दलाची आज 29 पथकांपर्यंत वाढ झाली आहे. या दलाने आतापर्यंत 353 माओवाद्यांचा खात्मा, 424 जणांना अटक आणि 814 जणांचे आत्मसमर्पण घडवून आणत नक्षलविरोधी मोहिमेत मोठे योगदान दिले आहे.
यानंतर पोलीस मुख्यालयात राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक एम. रमेश व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी पोलीस दलाकडून आकर्षक पथसंचलन सादर करण्यात आले.
कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा, गोकुल राज जी., सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे, पोलीस उपअधीक्षक अनिरुद्ध कावळे, स्वप्निल इज्जपवार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here