महाराष्ट्र दिनी कुरखेड्याचा जल्लोष ; चार विद्यार्थी पोलीस दलात
The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा, दि. ०२ : महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या दुहेरी उत्साहात कुरखेडा तालुक्याने अभिमानाचा क्षण अनुभवला. विकास विद्यालय तथा थोरवी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथील चार माजी विद्यार्थ्यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तेजस हेमचंद नेवारे, अजित बाबुलाल थाटमुरा, श्रुती रवींद्र कसारे आणि आफ्रीन झाकीर शेख यांची नुकतीच महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली. या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत शाळेच्या वतीने सर्वांचा विशेष सत्कार करण्यात आला.
अत्यंत मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर या विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीचे कठीण आव्हान पार केले. प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण पूर्ण करत त्यांनी यशाचा मानाचा तुरा रोवला. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी पालक, शिक्षक आणि शाळेच्या मार्गदर्शनाला दिले.
यावेळी मुख्याध्यापक अलगदेवे सर म्हणाले, “या विद्यार्थ्यांचे यश सध्याच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अफाट क्षमता असून योग्य दिशा मिळाल्यास ते कोणत्याही क्षेत्रात चमकू शकतात.”
महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणानंतर शाळेच्या प्रांगणात झालेल्या सत्कार सोहळ्यास शिक्षकवृंद, पालक, ग्रामस्थ आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चार विद्यार्थ्यांच्या या यशामुळे कुरखेडा तालुक्याचा मान उंचावला असून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.













